खुशबू सक्सेनाच्या मृत्यूचे गूढ कायम Print

प्रतिनिधी
रविवारी मध्यरात्री वाकोला येथील पुलावरून पडून मृत्यू पावलेल्या खुशबू सक्सेना (२६) या तरुणीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मानसिक धक्कयाने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अंधरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्समधील स्वीस कॉम्प्लेक्समध्ये राहणारी खुशबू ही रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वाकोला पुलावरुन पडून मरण पावली होती. तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. त्याचवेळी तिची पुलावरुन ढकलून हत्या करण्यात आली असावी अशीही एक शक्यता वर्तविण्यात येत होती. तिचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यात जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  रविवारी रात्री ९ वाजता खुशबू आपल्या अंधेरी येथील घरातून बाहेर पडली होती. रात्री एकच्या सुमारास ती वाकोला पुलावरून खाली पडली. तिला उपस्थित लोकांनी व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या जीन्सच्या खिशात असलेल्या मोबाईलद्वारे तिची ओळख पटली. खुशबू अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्स मध्ये तीन बहिणी आणि आई वडिलांसह रहात होती. तीनच वर्षांंपूर्वी सक्सेना कुटुंबीय आग्रा येथून मुंबईत स्थायिक झाले होते. तेथील प्रसिद्ध संगीत घराण्याशी हे कुटुंंब संबंधित होते. नेमका कुठला मानसिक धक्का तिला बसला असावा, याचा शोध घेतला जात असल्याचे वाकोल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र परदेशी यांनी सांगितले.