चर्चगेट-विरार एसी लोकलची मागणी मान्य Print

वसई/प्रतिनिधी
चर्चगेट-विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या दृष्टीने या मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार संजीव नाईक यांना दिले आहे.
भाईंदर व मीरारोड येथील प्रवाशांच्या विविध समस्या खासदार नाईक यांनी एका बैठकीत अलीकडेच रेल्वेच्या महाव्यवस्थापकांपुढे मांडल्या. त्या वेळी महाव्यवस्थापक महेंद्रकुमार म्हणाले की, एसी लोकल सेवा एप्रिलपर्यंत मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. भाईंदर-मीरारोड येथे विरारहून येणारी प्रत्येक लोकल गाडी पूर्णपणे भरलेली असते, त्या प्रवाशांना पुढे चर्चगेटपर्यंतचा सुमारे तासाभराचा प्रवास खच्च भरलेल्या गाडीतून उभ्याने करावा लागतो. या प्रवाशांसाठी भाईंदर-चर्चगेट लोकल हव्या. फलाटांची उंची वाढविण्याची गरज आहे या आणि अशा मागण्या यापूर्वी खा. नाईक यांनी मांडल्या आहेत. त्यांचा आढावा एका बैठकीत घेण्यात आला.