वसई साहित्य आणि कला महोत्सव संपन्न Print

वसई/प्रतिनिधी
वसईतील ‘सहयोग’ संस्थेच्या वतीने रविवारी वसई साहित्य आणि कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन ही पुढच्या पिढीसाठीची लढाई आहे. दीर्घकाळाने गुण येईल असे हे औषध आहे. घराणेशाही हा इथल्या लोकशाहीत जडलेला रोग आहे. हा रोग दूर करण्यासाठी माणसे पुढे येत आहेत, हे आशादायक चित्र आहे. विजय पांढरे यांच्यासारख्या सद्शील माणसांनी आता अशा पद्धतीने पुढे यावे.
‘आजचा सिनेमा आणि वास्तव’ या विषयावर पत्रकार मुकेश माचकर यांनी आपले विचार मांडले. मनोज आचार्य यांनी प्रास्ताविक भाषण केले. हिंदी साहित्यसृष्टीतील लेखिका सुधा अरोरा यांनी ‘साहित्य व समाज’ या विषयावर उत्तम विचार मांडले. शोभा बागूल यांनी प्रास्ताविक केले. उदयोन्मुख कलावंतांनी सुंदरसे वसई दर्शन घडविले. मार्टिन लोपिस, कॅथलिक बँकेचे अध्यक्ष डॉमनिक डिमेलो, डॉ. बी. ए. खरवडकर व भरत पेंढारी हे सारे जण भव्य अशा ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.