दिवाळी अंक यंदा करणार शंभरी पार! Print

प्रस्थापित अंकांची किंमत १२० ते १५० रुपये
प्रतिनिधी
सर्व क्षेत्रांत वाढलेल्या महागाईमुळे यंदा बहुतांश दिवाळी अंकांच्या किमती शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार आहेत. तर प्रस्थापित अंकांच्या किमती यंदा १२० ते १५० रुपयांपर्यंत जाणार आहेत. जाहिरातदारांनीही हात आखडता घेतल्याने मोठे अंक वगळता इतरांना जाहिराती मिळविणे जिकिरीचे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 दरवर्षी मराठीत साडेतीनशे ते चारशे अंक प्रकाशित होतात. सार्वजनिक आणि खासगी ग्रंथालयांकडून दिवाळी अंक मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात. अर्थात वैयक्तिक स्तरावरही अंक विकत घेतले जातात. मात्र भाववाढीचा फटका काही प्रमाणात दिवाळी अंकांच्या खरेदीला बसणार आहे. रसिक साहित्यप्रेमींना दिवाळी अंक विकत घेताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.
किमती वाढल्या तरी ग्रंथालये आणि वैयक्तिक स्तरावर दिवाळी अंक खरेदी केले जातातच. काही प्रकाशन संस्था तसेच दिवाळी अंकांच्या संघटनेकडून दिवाळी अंकांसाठीची सवलत योजना जाहीर केली जाते. दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविले जाते. अशा उपक्रमांमधून दिवाळी अंक चांगल्या प्रमाणात विकले जातात. ललित साहित्य, धार्मिक, ज्योतिष, आरोग्य, पाककृती, गुन्हेविषयक आदी विषयांवरील दिवाळी अंकांना मोठी मागणी असल्याचे ‘बी.डी. बागवे आणि कंपनी’चे गुरुनाथ बागवे यांनी सांगितले.दरम्यान, यंदाच्या वर्षी जाहिरात कंपन्यांनीही काही प्रमाणात हात आखडता घेतल्याने प्रस्थापित अंक वगळता अन्य दिवाळी अंकांना जाहिराती मिळविणे थोडे जिकिरीचे झाले आहे. कागद, वाहतूक खर्च, छपाई यांचेही दर वाढल्याने दिवाळी अंकांचे गणित जमविताना तारांबळ उडत आहे, असे एका प्रकाशकाने सांगितले.