मोनोरेलचा मुहूर्त हुकणार Print

प्रतिनिधी
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा जानेवारी २०१३ पर्यंत सुरू करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेला मुहूर्त हुकणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा जाहीर केलेला मुहूर्त गाठता न येण्याची ‘एमएमआरडीए’ची परंपरा कायम राहणार आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या सुमारे २० किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल धावणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे २३०० कोटी रुपये असून चार डब्यांच्या मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६२ असणार आहे. चेंबूर ते वडाळा हा नऊ किलोमीटरचा पहिला टप्पा असणार आहे. या पहिल्या टप्प्यावरील मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मोनोरेलच्या चाचण्या घेण्यात आल्या. दिवसा-रात्री चाचणीसाठी धावणाऱ्या रंगीत मोनोरेलची आकर्षक छायाचित्रेही झळकली. मोनोरेल मार्गाचे बांधकाम, त्याची सुरक्षितता, मोनोरेलची चाचणी अशा विविध गोष्टी यामध्ये पडताळून पाहण्यात आल्या. त्या यशस्वी ठरल्यानंतर चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी जानेवारी २०१३ हा मुहूर्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केला.
मोनोरेलचे बांधकाम ‘एल अँड टी’कडे असून मोनोरेल चालवण्यासाठी ‘स्कोमी इंटरनॅशनल’ या मलेशियात मोनोरेल सेवा देणाऱ्या कंपनीशी करार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील मोनोरेलच्या मार्गाचे काम नोव्हेंबर २०१२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, मोनोरेल स्थानकांच्या बांधकामात थोडा विलंब होत आहे. सरकते जिने, जोडरस्ते आदी गोष्टींमुळे स्थानकांचे बांधकाम पूर्ण होण्यास आणखी काही महिने जातील असे दिसते. त्यामुळे जानेवारी २०१३ मध्ये चेंबर-वडाळा टप्प्यावर मोनोरेल सेवा कार्यान्वित होणे अशक्य असल्याची कबुली प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या हुकणाऱ्या मुहूर्ताची प्राधिकरणाची परंपरा कायम राहणार आहे.