मणिरत्नमच्या चित्रपटातून ऐश्वर्याचे पुनरागमन Print

प्रतिनिधी

चित्रपट करिअर, विवाह आणि आता मातृत्व अशा तिन्ही आघाडय़ांवर बाजी मारल्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा चित्रपटात कधी परतणार, याची चाचपणी सध्या बॉलिवूड करीत आहे. प्रसुतीनंतर ऐश्वर्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. पण त्याकडे फारसे लक्ष न देता अतिशय आत्मविश्वासाने ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. तिथून परतल्यानंतर हळूहळू जाहिराती आणि अन्य आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही काम सुरू करीत ऐश्वर्या सक्रिय झाल्याने ती लवकरच पुन्हा चित्रपट करणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. पुनरागमनासाठी ऐश्वर्याने आपला आवडता दिग्दर्शक मणिरत्नम याच्या चित्रपटाची निवड केल्याचे समजते.
मणिरत्नम यांच्या चित्रपटांचे ऐश्वर्याच्या कारकीर्दीत आणि व्यक्तिगत आयुष्यातही महत्त्वाचे स्थान आहे. १९९७ साली तिने पहिल्यांदा मणिरत्नमच्या ‘इरुवर’ या तामीळ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील ऐश्वर्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली. त्यानंतर दहा वर्षांनी ऐश्वर्या आणि मणिरत्नम पुन्हा एकत्र आले ते ‘गुरु’साठी. ‘गुरु’मधील सर्वार्थाने वेगळ्या भूमिकेसाठी तिचे कौतुक तर झालेच; शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची पडद्यावर जमलेली जोडी वास्तवातही विवाहाच्या बोहल्यावर चढली. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकने मणिरत्नमबरोबर केलेला ‘रावण’ मात्र फारसा चालला नाही.
१९३८ साली दाफने डु मॉरिअर याच्या गाजलेल्या ‘रिबेका’ या कादंबरीवर मणिरत्नम पुढील चित्रपट करणार असून मध्यवर्ती भूमिकेसाठी त्यांनी ऐश्वर्याला विचारणा केली आहे. ‘रिबेका’ ही कादंबरी एका नवविवाहित तरुणीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. विवाहानंतर तिच्या घरचे सतत तिची तुलना तिच्या सवतीशी करतात. आपल्या सवतीचा शोध घेता घेता भूतकाळातील अनेक गोष्टी तिला उलगडू लागतात, असे हे कथानक आहे. सध्या या कादंबरीतील नाटय़ संपूर्णपणे भारतीय साच्यात उतरवण्याचे काम सुरू आहे. पटकथा तयार झाल्यानंतर या वर्षांअखेरीस हा चित्रपट चित्रिकरणासाठी तयार असेल आणि २०१४ मध्ये तो प्रदर्शित होईल.