नव्या धोरणाच्या प्रतीक्षेत मंडया शरपंजरी! Print

प्रसाद रावकर

नव्या धोरणाची प्रतीक्षा करता करता मुंबईमधील मंडया आता शरपंजरी पडू लागल्या आहेत. धोकादायक बनलेल्या या मंडईंकडे ग्राहक जिवाच्या भीतीने पाठ फिरवू लागले आहेत. या परिस्थितीमुळे व्यापारी मंडळी हवालदिल झाली आहेत. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप यांची कुंभकर्णी झोप अजूनही उडालेली नाही. मुंबईमध्ये एकीकडे झकपक मॉल उभे राहत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या मंडईंची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत चालली आहे. मोडकळीस आलेल्या या मंडईंमध्ये ग्राहकांचा ओघ कमी होऊ लागला आहे. अशा २५ मंडईंना पुनर्विकासासाठी पात्र इमारतींच्या यादीत (परिशिष्ट-२) समाविष्ट करण्यात आले होते. त्यापैकी १२ मंडईंना ‘इरादापत्रही’ मिळाले. मात्र कुठे तरी माशी शिंकली आणि नवे धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत मंडईंच्या पुनर्विकासाला खीळ बसली. मात्र ‘इरादापत्र’ मिळाल्याने आठ मंडईंच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि १३ मंडई नव्या धोरणाच्या प्रतीक्षेत शरपंजरी पडल्या.
खारमधील आचार्य आत्माराम भाऊ लाड मंडई यापैकीच एक. मोडकळीस आलेल्या या मंडईत २६४ व्यापारी आणि ८० मच्छीमार व्यवसाय करतात. या मंडईला ‘परिशिष्ट-२’ मिळाल्यामुळे व्यापारी खूश झाले होते. परंतु मंडईंबाबत नवे धोरण येऊ घातल्यामुळे हे ‘परिशिष्ट-२’ रद्द करण्यात आले आणि पुनर्विकासाला खीळ बसली. आजघडीला या मंडईच्या छपराचे प्लास्टर कोसळून लोखंडी शिगा दिसू लागल्या आहेत. संपूर्ण छप्परच कधी कोसळेल याचा नेम नाही. पाण्याच्या टाकीतून ‘ठिबक सिंचन’ होत आहे. पावसाळ्यात गळती होत आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी व्यापारी आणि मच्छीमार नाइलाजाने येथे व्यवसाय करीत आहेत. पुनर्विकासाचे दरवाजे बंद केल्यानंतर आचार्य आत्माराम भाऊ लाड व्यापारी मंडळाने पालिका प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. या संदर्भातील धोरण निश्चित होत आहे, तीन आठवडे थांबा, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अनेक महिने लोटले तरी धोरण निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे आचार्य आत्माराम भाऊ लाड व्यापारी मंडळाने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र पाठविले. अखेर प्रशासनाने येथील व्यापाऱ्यांना वर्सोवा, गोरेगाव, मरोळ, मालाड आदी ठिकाणच्या मंडईंमधील मोकळय़ा जागेत व्यवसाय करण्याची अनुमती दिली. परंतु तेथे आपले ग्राहक येणार नाहीत, असे कारण देऊन येथील व्यापाऱ्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. गेल्या काही वर्षांत पालिकेच्या आयुक्तपदी पाच जण येऊन गेले. परंतु त्यापैकी एकानेही या मंडईला न्याय दिलेला नाही, अशी खंत येथील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या मंडईच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर पालिकेच्या पर्यावरण विभागाची प्रयोगशाळा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पालिका कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. पालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली असून निवासस्थाने रिकामी करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांवर नोटिसा बजावल्या आहेत. मात्र या बाकानगरीत आसरा नसल्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन दिवस कंठत आहेत.