दहशतवादविरोधात मिशन मृत्युंजय Print

प्रतिनिधी

मुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार कायम आहे. दहशतवाद्यांमध्ये १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या तरुणांना बालवयातच ‘जिहाद’चे डोस पाजले जातात. ‘जन्नत’ची वेगळी परिभाषा सांगितली जाते. त्याला हे तरुण भुलतात. त्याऐवजी या शाळकरी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नवे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘मिशन मृत्युंजय’ सुरू केले आहे.  नागपूर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त असताना डॉ. सिंग यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच मुंबईतही हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे डॉ. सिंग यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले. ही संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी कसाब याच्या जबानीतच नमूद केले आहे की, जिहादसाठी मेल्यानंतर ‘जन्नत’मध्ये जागा मिळते. ही जन्नत म्हणजे जेथे नुसते सुख असते. तेथे मध, दुधाची नदी वाहते. स्वागतासाठी सुंदर पऱ्या असतात वगैरे वगैरे. पण ‘जन्नत’मध्ये जागा मिळेल हे कसे समजेल? यावर मेल्यानंतर शरीरातून सुगंध सुटतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे कसाबला शवागारात नेण्यात आले. परंतु मृतदेहांचा वास घेऊन त्याला घेरी आली. ‘जन्नत’ वगैरे काही नसते हे आपल्याला पटल्याचे कसाब सांगतो. ‘मिशन मृत्युंजय’मध्ये हा किस्सा प्रामुख्याने सांगितला जातो, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये तसेच मदरसामध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने स्लाईड शोद्वारे व्याख्याने द्यावीत, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे. यासाठी ८९ पोलीस ठाण्यांतील वक्ते अधिकारी, शिपायांची निवड करण्यात आली आहे. या सर्वाना आपण स्वत: मार्गदर्शन केले आहे. या विद्यार्थ्यांशी नेमका संवाद कसा साधायचा, याबाबत सविस्तर रूपरेषा आखण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहशतवादाबाबतची माहिती देण्याबरोबरच अशा घटना रोखण्यासाठी त्यांच्या पातळीवर काय करता येईल, याचीही माहिती दिली जाणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर हा उपक्रम सुरू होणार आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.