बर्फी शंभर कोटींची Print

प्रतिनिधी

‘हलवाई’ अनुराग बसूने तयार केलेली ‘बर्फी’ची किंमत आता शंभर कोटी झाली आहे. ऑस्करमध्ये भारतातर्फे पाठवल्या जाणाऱ्या या चित्रपटाने भारतात शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमा केला आहे. विशेष म्हणजे यंदा शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांची संख्या आता ६ वर गेली आहे. बर्फी नावाच्या मूकबधीर मुलाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बर्फी’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, १४ सप्टेंबर रोजी, ९.२० कोटींचा गल्ला जमा केला होता. तर त्यापुढील दोन दिवसांत आणखी ३४.६ कोटी रुपये कमावले. त्यानंतर त्याची निवड ऑस्करसाठी झाली आणि ‘बर्फी’ पुन्हा तेजीत आला. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवडय़ात ५८ कोटींची कमाई करणाऱ्या ‘बर्फी’ने बुधवारी शंभर कोटींचा आकडा पार केला.
‘बर्फी’च्या यशामुळे रणबीर कपूरही ‘हंड्रेड करोड क्लब’मध्ये जाऊन बसला आहे. यंदा प्रदर्शित झालेल्या चाळीसहून जास्त चित्रपटांपैकी सहा चित्रपटांनी शंभर कोटींहून अधिक गल्ला जमवण्याचा ‘पराक्रम’ केला आहे. यात सर्वात जास्त गल्ला सलमान खानच्या ‘एक था टायगर’ने जमवला. त्याखालोखाल अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोड’चा क्रमांक लागतो. त्याने १३१ कोटींची कमाई केली. हिंदी चित्रपटसृष्टीला यंदा पहिला ‘हंड्रेड करोड क्लब’ चित्रपट जानेवारी महिन्यातच मिळाला. हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांची भूमिका असलेल्या ‘अग्निपथ’ने १०० कोटींहून अधिक धंदा केला होता. त्यानंतर ‘बोलबच्चन’, ‘हाऊसफुल्ल- २’, ‘रावडी राठोड’, ‘एक था टायगर’ आणि बर्फी यांचा समावेश आहे.    
‘हंड्रेड करोड क्लब’च्या चित्रपटांचा षटकार
चित्रपट                       कमाई (कोटींमध्ये)
* एक था टायगर         १९८
* रावडी राठोड         १३१
* अग्निपथ         १२३.०५
* हाऊसफुल्ल-२         ११४
* बोलबच्चन        १०२
* बर्फी                        १०१.५०