गुन्हेगारी टोळ्यांचेही ‘पीआरओ’.. Print

निशांत सरवणकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

आपली व कंपनीची प्रतिमा उजळ व्हावी यासाठी कार्पोरेट क्षेत्रातील ‘पीआरओ’गिरी मशहूर आहे. ‘पीआर’गिरीपेक्षा विविध सरकारी कार्यालयातील लायझनिंगची जबाबदारीही याच मंडळीवर असते. गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांनीही आता आपापल्या ‘भाई’चे लायझनिंग करण्यासाठी ‘स्वच्छ चारित्र्या’च्या  तरुण व तडफदार तरुणांची ‘पीआरओ’ म्हणून नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणांना महिन्याकाठी २० हजार ते ३० हजार रुपये पगार दिला जात आहे. अर्थात या तरुणांना आपण ज्या कंपनीत काम करतो ती ‘भाईची कंपनी’ आहे याची कल्पनाच नसते, असेही आढळून आले आहे.
मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा कणा गुन्हे अन्वेषण विभागाने मोडल्यानंतर भाईंनी या ‘पीआरओ’गिरीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. चेंबूरमध्ये मोठय़ा प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. ही कामे विविध कंपन्यांच्या नावे सुरू असली आणि या कंपनीच्या संचालक मंडळावर ‘भाई’शी संबंधित कुणीतरी असतो, हे आता गुपित राहिलेले नाही. त्यामुळे एखाद्या पुनर्विकासात अडचण निर्माण झाली की स्थानिक पोलीस ठाणे, पालिका कार्यालयाला ‘मॅनेज’ करण्यासाठी या पीआरओंची नियुक्ती करण्यात येते. चेंबूर परिसरातील पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपद भूषविलेल्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. छोटा राजन टोळीच्या वतीने असे काही ‘पीआरओ’ त्यावेळी पोलीस ठाण्यात आले होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ‘भाई’ला आता गुन्हेगारीत रस नाही. बांधकाम व्यवसायात त्याचा चांगला जम बसला आहे. जरा लक्ष ठेवा, असे ही कथित मंडळी सांगत असतात.
जे. डे हत्येप्रकरणी सध्या अटकेत असलेला छोटा राजनचा एकेकाळचा चालक जोसेफ पोल्सन तसेच बुकी आणि नंतर बिल्डर म्हणून मिरवणारा विनोद चेंबूर हे छोटा राजनचे खास ‘पीआरओ’ होते, अशी माहितीही एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ‘भाई’शी संबंधित कुठल्याही प्रकरणात हेच दोघे लायझनिंग करीत असत. गुन्हे अन्वेषण विभागातील अनेक बडय़ा अधिकाऱ्यांना हे दोघे भेटत होते. परंतु जे. डे हत्याप्रकरणात त्यांचा संबंध उघड झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हात झटकून टाकले. आता काही तरुणांचा या कामासाठी वापर केला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
गुंड रवी पुजारीचा पीआरओ म्हणून रवी पंजाबीचे नाव घेतले जात होते. हा रवी पंजाबी खार परिसरात बिल्डर म्हणून वावरत होता. परंतु आतून रवी पुजारीसाठी काम करीत होता. याची माहिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. खंडणीच्या काही प्रकरणात त्याचा संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला गजाआड करण्यात आले. रवी पुजारीचे लायझनिंग आता मात्र थंडावल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दाऊद व छोटा शकीलशी संबंधित गुंडांचा दक्षिण मुंबईतील उत्तुंग टॉवर्समध्ये अप्रत्यक्ष संबंध असल्याचे या ‘पीआरओगिरी’नंतरच पोलिसांच्या लक्षात आले, याकडेही काही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
गुंड टोळ्यातील पीआरओची परंपरा तशी जुनीच असल्याचे सांगितले जाते. दाऊद टोळी फॉर्मात असताना सतीश राजे हा पीआरओ म्हणून वावरत होता तर अरुण गवळीने या ‘पीआरओ’गिरी साठी थेट राजकीय पक्षाचीच स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून काही तरुणांची ‘पीआरओ’गिरी सुरू होती. खंडणीच्या प्रकरणात अश्विन नाईकला पुन्हा अटक झाली तेव्हा त्याच्या वतीने लायझनिंग करण्यासाठी त्याचे अभियंते मित्र पुढे आले होते, असेही सूत्रांनी सांगितले.