चतुरंगच्या ‘एक कलाकार- एक संध्याकाळ’ उपक्रमात अशोक हांडे Print

प्रतिनिधी
 चतुरंग प्रतिष्ठानने सुरू केलेल्या ‘पुन्हा एक कलाकार- एक संध्याकाळ’ या उपक्रमाअंतर्गत येत्या ११ ऑक्टोबर रोजी ‘चौरंग’संस्थेचे अशोक हांडे सहभागी होणार आहेत. आंब्याचे व्यापारी असलेले हांडे हे सूत्रधार, संवाद लेखक, दिग्दर्शक आणि गायक आहेत. त्यांच्या संस्थेतर्फे सध्या सुरू असलेला ‘मराठी बाणा’ आणि अन्य कार्यक्रम रसिकमान्य ठरले आहेत.  त्यांच्या समवेत गप्पागोष्टींचा हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर (पश्चिम) येथे होणार असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
कवितेचा जागर
आनंदयात्री कला साहित्य संस्कृती मंडळ आणि साहित्य दरवळ मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘कवितेचा जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालभारती पाठय़पुस्तक मंडळ-पुणेचे विशेषाधिकारी आणि कवी माधव राजगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात निमंत्रित कवी धनराज वंजारी, मनोहर रणपिसे, एकनाथ आव्हाड, ज्योती कपिले, डॉ. सुमन नवलकर, सूर्यकांत मालुसरे, प्रकाश खरात, प्रतिभा सराफ, डी. एन. गांगण, प्रा. पंढरीनाथ रेडकर आदींनी आपली स्वत:ची आणि आपल्याला आवडलेली अशा प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. सूत्रसंचालन अजित राऊळ यांनी केले.
तीन पुस्तकांवर परिसंवाद
इंदू शुक्लेंदू प्रकाशन आणि कालिंदी रेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दुपारी अडीच वाजता एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. पंढरीनाथ रेडकर यांनी लिहिलेल्या ‘कर्पिल’ (कथासंग्रह), मेरेवरची पाती (काव्यसंग्रह) आणि हंबर (ललित लेखसंग्रह) या तीन पुस्तकांवर होणाऱ्या परिसंवादात दिनकर गांगल, डॉ. महेश केळुस्कर, मोनिका गजेंद्रगडकर, प्रा. अशोक बागवे, नारायण लाळे, नमिता कीर आदी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक या वेळी उपस्थित राहणार आहेत.