वसई-विरार मनपाची परिवहन सेवा सुरू Print

वसई/प्रतिनिधी
देशातील सर्वाधिक लोकसंख्या वाढणारे वसई हे शहर असून, येथे सर्व नागरी सुविधा अपुऱ्या पडतात. पाणी, वीज, परिवहन सेवा तसेच सर्व प्राथमिक सुविधा पुरविण्याचा वसई-विरार महानगरपालिकेच्या  प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज परिवहन सेवेचे उद्घाटन करण्यात आले. वसईच्या पूर्व भागांत, नायगावच्या पूर्व भागांत तसेच उपेले खोचिवडे रानीवली, सातीवली, पेल्हार/ तसूनवघर अशा ग्रामीण व दुर्गम भागांत सुलभ पद्धतीने प्रवास करता यावा म्हणून ही बससेवा सुरू करण्यात आली, असे उद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काढले.
वसई-विरार महानगरपालिकेने भागीरथ ट्रान्स्पोर्ट कं.चे मनोहर सकराव यांच्या सहकार्याने आज हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिवहन सेवेचे उद्घाटन केले. या प्रसंगी महापौर राजीव पाटील, खासदार बळीराम जाधव, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार विलास तरे, उपमहापौर सगीर डांगे यांची भाषणे झाली.  आजपासून वसई स्टेशन ते वसई गाव, किल्ला बंदर, उमेळे, वालीव, एव्हरशाइन सिटी, सातीवली या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली.