बिग बॉसच्या घरात चंकी, गुलाबी गँगची कमांडर आणि पूनम पांडे? Print

अतुल माने

बिग बॉसचा सहावा अध्याय येत्या ७ ऑक्टोबरपासून कलर्स वाहिनीवर सुरू होत असून, यावेळी घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये अभिनेता चंकी पांडे तसेच वादग्रस्त सेक्स गुरू स्वामी नित्यानंद, तसेच मॉडेल पूनम पांडेसह उत्तर प्रदेशात महिलांसाठी आवाज उठविणाऱ्या गुलाबी गँगच्या सर्वेसर्वा संपतपाल देवी यांचा समावेश असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या आधीच्या सर्व भागांमध्ये अनेक व्हल्गर तसेच हिडीस प्रकार घरातील सदस्यांमध्ये झाले होते व याचे प्रक्षेपणही करण्यात आले होते. याबाबत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सलमान खान याने नाराजी व्यक्त करताना यावेळेचे भाग कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे पाहाण्यासारखे असावेत असे मत व्यक्त केले होते. अर्थात सलमान खान याचे हे मत वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी फारसे मनावर घेतले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी यावेळीही घरात वादग्रस्त व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये वादग्रस्त सेक्सगुरू स्वामी नित्यानंद याला विचारणा करण्यात आली असून, त्याने त्यासाठी संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी न्यूड फोटो प्रसिद्ध करणारी मॉडेल पूनम पांडे हिलाही घरात घेतल्यास आपोआपच त्याचा टीआरपीसाठी फायदा होईल, असा विचार करण्यात आल्याचे समजते. याच बरोबर संपूर्ण उत्तर प्रदेशात गुलाबी गँग म्हणून अस्तित्वात आलेल्या एका महिला टोळीच्या कमांडर संपतपालदेवी हिलाही विचारणा करण्यात आली आहे. मागील भागामध्येही बॉसच्या घरात डाकू, मॉडेल तसेच आध्यात्मिक गुरू यांचा समावेश होता. हीच परंपरा यावेळी कायम ठेवण्याचा वाहिनीचा प्रयत्न आहे. याबाबत वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देताना घरात कोणीही येऊ शकतो असे मत व्यक्त केले.  सलमान खान याने अलीकडेच या कार्यक्रमाबद्दल बोलताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे बसून पाहण्यासारखा त्याचा दर्जा असावा, असे मत व्यक्त केले होते. तसेच बॉसच्या घरामध्ये सर्वसामान्य व्यक्ती आणि काही मुलांनाही प्रवेश देण्यात यावा असेही सुचविले होते. अर्थात सलमानची ही सूचना प्रत्यक्षात कितपत साकारणार, याचे उत्तर ७ तारखेला पाहावयास मिळणार आहे.