निघाली वाऱ्यावरची वरात! Print

फिल्लमबाज

मराठी इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड थिएटर अ‍ॅवॉर्डस् (मिफ्ता)चं हे तिसरं वर्ष. मराठी कला सर्वदूर पोहोचावी, यासाठी ‘मिफ्ता’चा प्रपंच मांडण्यात आला. यंदाचा ‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळा सिंगापूर येथे होणार असून शनिवारी पुरस्कार प्रदान समारंभ पार पडणार आहे. मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीच्या बिनीच्या कलाकारांसोबत अनुभवलेला हा ‘मिफ्ता’चा रिपोर्ताज.. खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..
रंगमंचावर एकदा एन्ट्री घेतली किंवा कॅमेऱ्यासमोर उभं राहिलं का मग.. तो कलाकार त्याचाही उरत नाही..  भूमिकेवर स्वार होत आपण कोण आहोत, कुठे आहोत, हे विसरण्याची ताकद त्याची कला त्याला देते.. शेक्सपिअरच्या भाषेत ‘आय अ‍ॅम नॉट व्हॉट आय अ‍ॅम’ अशी त्या कलावंताची भावावस्था असते! तो अनुभवत असतो समोरचे प्रेक्षागार, भूमिका निभावतानाचा मनाच्या तळातून उसळणारा आनंद, उचंबळून येणारा उत्साह, ओघळलेला एखादा अश्रूचा थेंब, एखाद्या वाक्यफेकीच्या वेळेस बिथरलेलं मनही.. पण आज मात्र रंगमंचावर नसताना किंवा कॅमेराही समोर नसतानाही समस्त मराठी कलावंताना तसं वाटतंय.. कलेची धुंदी, झपाटलेपण, िझग त्यांना चढू लागली आहे.. ‘मिफ्ता’ पुरस्कारासाठी सिंगापूरला रवाना होताना साऱ्या कलाकारांच्या मनात अशीच काहीशी भावना आहे.
परदेशाची नवलाई वाटण्याचे दिवस आज सरलेत. मराठी कलावंतांना आपली कला सादर करण्याकरिता दूरदेशी जाण्याच्या नवनव्या संधी चालून येतायत.. तरीही ‘मिफ्ता’च्या निमित्तानं सारे जातभाई एकत्र निघालेत! परस्परांना कोपरखळ्या मारत प्रवास करत जाण्याची मजा काही औरच! इथे मिरवली जाणारी लोकप्रियतेची झूल बाजूला सारत सिंगापूरला निघताना ‘मिफ्ता’च्या या कौटुंबिक सोहळ्यात एक घटक म्हणून सहभागी होण्यास लहान-थोर सारे कलावंत उत्सुक आहेत.. डोळ्यांना नवं पाहण्याची हौस आहे.. मनाला नवी मनं जोडण्याचा उत्साह आहे.. आपल्या कलेच्या सादरीकरणाने ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ अशी प्रतिज्ञा घ्यावी, असा हा क्षण! एखाद्या कलाकारासाठी याहून महत्त्वाचा क्षण तो काय असावा?
‘सिंगापूर आय’ नावाचा एक महाकाय पाळणा तिथं आहे. आपल्या जत्रेतल्याच पाळण्यासारखा, पण खूप मोठ्ठा! आणि अगदी संथ गतीनं फिरणारा. त्या पाळण्यातून अख्ख्या सिंगापूरचं दर्शन तुम्हांला होतं. सिंगापूरचं काय, लगतच्या मलेशियाची सीमाही दिसते, म्हणे! या गोष्टीकडे प्रतीकात्मक दृष्टय़ा पाहिलं तर असचं म्हणावंसं वाटतं की.. जमलं तर आपल्या मराठमोळ्या चित्रपटसृष्टीने सिंगापूरमधून आपल्या मराठी चित्रपटांकडे दृष्टिक्षेप टाकावा. मराठी नाटक-चित्रपटांचा दर्जा, विपणन, वितरण, प्रेक्षकांची अभिरुची या साऱ्याकडे ‘मिफ्ता’च्या सिंगापूरी पाळण्यातून बघावे जरा.. या एकत्र येण्यातून काही हाती लागलं तर ‘मिफ्ता’ची कथा सफल संपूर्ण ठरेल. तूर्तास वाऱ्यावरच्या वरातीवर स्वार होतोय.. इतकंच!