असा आहे आठवडा ! Print

‘मुक्तांगण’च्या कार्याचा गौरव सोहळा  
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघ या संस्थेतर्फे अनेक वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांबरोबरच उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरवही केला जातो. यंदाचा ‘महाराष्ट्र सेवा संघ सामाजिक संस्था’ पुरस्कार व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेला देण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड येथील सु. ल. गद्रे सभागृहात होणार आहे. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते ‘मुक्तांगण’चे कार्यवाह डॉ. अनिल अवचट यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्काराच्या निमित्ताने डॉ. अनिल अवचट व डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर घेणार आहेत. या सोहळ्याच्या ठिकाणी ‘मुक्तांगण’साठी देणगी संकलनाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीचा वसा घेऊन काम करणाऱ्या ‘मुक्तांगण’सारख्या केंद्राचे काम कसे चालते हे लेखक आणि संस्थेचे कार्यवाह डॉ. अवचट यांच्याकडून ऐकण्याची संधी मिळणार आहे.
एमबीए विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
मायरा बिझनेस स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेतर्फे एमबीएसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. एमबीएचे शिक्षण देणाऱ्या जगभरातील संस्थांमधील प्रवेशासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, त्याची सविस्तर माहिती याबाबत विनोद उर्स हे मार्गदर्शन करणार आहे. जुहूच्या जे. डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मार्गदर्शन सत्राला सुरुवात होईल.
पर्शराम सुतार यांच्या चित्रांचे प्रदर्शन
चित्रकार पर्शराम सुतार यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘सेन्शुअस स्प्लेन्डर’ ९ तारखेपासून जहांगीर कला दालनात भरविण्यात येत आहे. भारतातील पुराणवस्तू या विषयावरील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून अजिंठा, वेरुळच्या लेण्यांबरोबरच पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडेराया, जुनी मंदिरे यासारखी चित्रे कॅन्व्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांमध्ये पाहायला मिळतील. हे प्रदर्शन १५ ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहील.
‘ऱ्हिदम ऑफ कलर’
‘ऱ्हिदम ऑफ कलर’ हे समूह प्रदर्शन खारच्या ‘पेंटेड ऱ्हिदम’ कला दालनात भरविण्यात आले आहे. अरविंद महाजन, असीत कुमार पटनाईक, आसिफ हुसैन, सुब्रता सेन, आनंद पांचाळ, दिलीप चौधरी, लक्ष्मण अ‍ॅले, प्रकाश देशमुख अशा कलावंतांची चित्रे यात पाहायला मिळतील. तऱ्हेतऱ्हेची माणसे, त्यांची उभी राहण्याची पद्धत, त्यातून व्यक्त होणारा भाव अशा चित्रांबरोबरच घडा घेऊन पाणी भरण्यासाठी चाललेली तरुणी, नदीच्या घाटावरून दिसणाऱ्या जुनी वास्तुरचना यांसारखी चित्रे यात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन रामजानकी, ३५६, ल्िंाकिंग रोड, खार पश्चिम येथील ‘पेंटेड ऱ्हिदम’ कला दालनात ६ ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
‘अर्धागिनी’ प्रदर्शन
फॅशन डिझायनर गौरांग हर्षे यांच्या पुरस्कारप्राप्त ‘कलेक्शन’चे प्रदर्शन ‘अर्धागिनी’ सध्या वांद्रे पश्चिम एस. व्ही. रोड येथील जीवन किरण या सभागृहात भरविण्यात आले आहे. हातांनी विणलेले महिलांचे कपडे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. कांजीवरम, कलमकरीबरोबरच खादीचे वैशिष्टय़पूर्ण कलेक्शन यात मांडले असून हे प्रदर्शन शुक्रवापर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
‘गीत नवे माझे’
‘सुमधुरा’ या बोरिवलीतील संस्थेतर्फे ‘गीत नवे माझे’ संगीतमय कार्यक्रम शनिवार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मधुवंती पेठे यांच्या रागदारी बंदिशी व त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी यात सादर केली जाणार आहेत. श्रीरंग भावे, यशस्वी सरपोतदार, स्वरदा साठे, रागेश्री आगाशे-कुळकर्णी ही गाणी सादर करणार असून निरंजन लेले व श्रीनिवास शेंबेकर हे कलावंत साथसंगत करतील. संगीत रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर करणार आहेत.
‘रेनबो’
तुषार दास, सुब्रता कार, देबमित्रा चौधरी, अमित कुमार, अनशु, मंजू कुमारी, किन्कार साहा, सुब्रता कर्माकर अशा सात चित्रकार-शिल्पकारांचे समूह प्रदर्शन ‘रेनबो’ हे ओशिवरा येथील अक्स कला दालनात भरविण्यात आले आहे. अ‍ॅक्रिलिक  रंग, जलरंग अशा विविध रंगांचा वापर करून काढलेली चित्रे, अमूर्त चित्रे तसेच शिल्पाकृती यात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन १० ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पाहायला मिळेल.
संजीवनी भेलांडे यांचे गायन   
ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाला आर्थिक मदतनिधी उभारण्यासाठी इच वन टीच वन या संस्थेतर्फे संजीवनी भेलांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम रविवार, ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. वांद्रे येथील माणिक सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका इच वन टीच वन चॅरिटेबल फाऊण्डेशन, हिरजी बाग, शिवडी पश्चिम येथे उपलब्ध आहेत. संपर्क- २४१०२५५५५.
शमा सोंधी यांच्या चित्रांचे प्रदर्शन  
काश्मीरच्या चित्रकार शमा सोंधी यांचे ‘पाइग्नंट सायलेन्स’ हे अमूर्त चित्रांचे प्रदर्शन हिरजी जहांगीर कला दालनात सुरू झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील सौंदर्य आणि शांतता, तेथील काही ठिकाणांना भेट दिल्यावर निर्माण झालेले नाते यावर आधारित चित्रांचे हे प्रदर्शन ९ ऑक्टोबपर्यंत खुले राहणार आहे.
सौंदर्यविषयक परिषद व प्रदर्शन
सौंदर्यविषयक परिषदेचे आयोजन सौंदर्यतज्ज्ञ भारती शेवाळे, रूपल आणि संजय ठक्कर यांनी ८ व ९ ऑक्टोबर रोजी केले आहे. सौंदर्य प्रसाधन उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर रंगभूषा, केशरचना, नेलपॉलिश यातील तज्ज्ञ मंडळीही सहभागी होणार आहेत. महिलांसाठी विविध सौंदर्य प्रसाधनांचे प्रदर्शन, विक्री तसेच स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्वचा, केस, रंगभूषा, नखे यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध उत्पादने करणाऱ्या उद्योगांचे प्रतिनिधी या संदर्भातील चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत. सौंदर्यविषयक प्रदर्शनामध्ये सलून व्यवस्थापन, बिंदी, केसांचे रंग, हर्बल उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने, त्वचारोगतज्ज्ञ, ड्रेस डिझायनर, नेल आर्ट, ज्वेलरी डिझायनर, केसांसाठी अ‍ॅक्सेसरीज, ब्युटी पार्लर अ‍ॅक्सेसरीज यांचे स्टॉल्स पाहायला मिळतील. कमीतकमी खर्चात सौंदर्यविषयक काळजी कशी घ्यावी याच्या टिप्सही दिल्या जाणार आहेत. या संदर्भातही महिलांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम, ‘ब्युटिशियन’ म्हणून व्यवसाय करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शन या परिषदेदरम्यान केले जाणार आहे. एनएसई नेस्को कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव पूर्व येथे हे प्रदर्शन व परिषद दोन दिवस चालणार आहे. यात सौंदर्यविषयक व्यवसाय-उत्पादने निर्मिती व विक्री करणाऱ्या लोकांबरोबरच सर्वसामान्य लोकांनाही सहभागी होता येईल.      
‘भैरवी से भैरवी’
पंचम निषाद संस्थेतर्फे ‘भैरवी से भैरवी’ या संगीत मैफलीचे आयोजन रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. मैफलीची सुरुवात मुरलीधर पारसनाथ यांच्या भैरव व अहिरभैरव या रागांच्या वादनाने सुरू होणार असून सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंदी, गायिका मंजिरी असनारे-केळकर, निलाद्री कुमार, शाश्वती मंडल, संजीव चिमलगी, सावनी शेंडे, मिलिंद रायकर, भुवनेश कोमकली, साबीर खान असे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील गायक-वादक यात सहभागी होणार आहेत. रात्री ११.३० वाजेपर्यंत ही मैफल ऐकायला मिळणार असून तीन सत्रांमध्ये शास्त्रीय गायनाबरोबरच सारंगी, व्हायोलीन, सतारवादन ऐकण्याची संधी शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक प्रहरातील राग गायन अथवा वादनाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत. मैफलीच्या प्रवेशिका दादर येथील महाराष्ट्र वॉच कंपनी तसेच बुकमायशो या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध आहेत.