साहित्य-सांस्कृतिक : ‘गेली २१ वर्षे’ नाटक स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे -अभिराम भडकमकर Print

प्रतिनिधी
धर्मकीर्ती सुमंत लिखित ‘गेली २१ वर्षे’ हे नाटक स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे असून नाटकातून तरुण पिढीच्या जाणिवा व्यक्त होत आहेत, असे प्रतिपादन अभिनेते-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी बुधवारी दादर येथे केले.
मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जयवंत दळवी स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी, पुरस्कार विजेते लेखक सुमंत, प्रमुख वक्ते निळकंठ कदम, मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना कदम म्हणाले की, सुमंत यांनी या नाटकातून समाजाचे पर्यायाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिबिंब व्यक्त केले आहे, तर सुमंत यांनी सांगितले की, सध्या या नाटकाचे प्रयोग प्रायोगिक रंगभूमीवर होत असून रसिक प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कोठावळे यांनी केले.
 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
राजगुरू टुर्सतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनातील आनंद किंवा गिर्यारोहण-एक आव्हान असे दोन विषय महाविद्यालयीन गटासाठी आहेत, तर खुल्या गटासाठी मी अनुभवलेली सहल किंवा पर्यटन एक थीम-२०१२ असे विषय आहेत. स्पर्धेचा निकाल येत्या ३० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी ०२२-२४३१८०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कारागृहात झाले भजन
मुंबई सवरेदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आर्थर रोड कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्वधर्मप्रार्थना आणि काही भजने सादर करण्यात आली. बजरंग सोनावणे आणि जानकीदीदी यांनी कारागृहातील कैद्यांना महात्मा गांधी यांच्या मूल्यांची ओळख करून दिली. कारागृह अधीक्षक अशोक राणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. १२० कैद्यांना या वेळी प्रा. हिना शहा यांनी शांती आणि अहिंसेची शपथ दिली.
सुलेखन प्रदर्शन
सुभाष गोंधळे यांच्या सुलेखनाचे प्रदर्शन काळा घोडा येथील अ‍ॅडोर हाऊस, आर्टिस्ट सेंटर गॅलरी येथे भरविण्यात आले असून ते येत्या ७ ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत खुले आहे.
पुस्तक प्रदर्शन
मुंबई सवरेदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नाना चौक येथील गांधी बुक सेंटर येथे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व सवरेदयावरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू असून पुस्तक खरेदीवर १० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.