एक उनाड दिवस! Print

फिल्लमबाज
दररोज शूटिंगमुळे सक्तीचं जागरण करणाऱ्या साऱ्या मऱ्हाटमोळ्या सेलिब्रिटींचं काल ऐच्छिक जागरण झालं. गेल्या वर्षीसारखं साऱ्या सेलिब्रिटींनी एकाच विमानातून सफर केली नाही, तर यंदा सारे सेलिब्रिटी आणि त्यामुळे त्यांचे हास्यविनोद, कोटय़ा याचे एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस अनेक विमानांमध्ये विभागले गेले. काल सुनील बर्वेचा वाढदिवस होता. तो सिंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या विमानात मोठय़ा दणक्यात साजरा झाला आणि याच जल्लोषात ‘मिफ्ता’चा सोहळा साजरा होणार, याची जणू वर्दी मिळाली. सकाळी सात वाजता विमान सिंगापूरच्या विमानतळावर उतरले आणि हा देश किती किती गोष्टींत किती पुढे आहे, याची झलक पुढच्या अवघ्या काही मिनिटांत बघायला मिळाली. महामार्गाचा प्रवास इतका सुखाचा असू शकतो, या अनुभवानं अक्षरश: भरून आलं. खड्डे, ट्रॅफिक, कर्कश हॉर्न्‍स आणि धुरापासून पुढील चार दिवस मुक्ती, याचा आनंद साऱ्या बसमध्ये पसरला!
शहरातून फेरफटका मारताना वारंवार मान वर करूनही बऱ्याच इमारतींचं टोकही दिसत नव्हतं. इथल्या अर्थकारणात विमानतळ मोठी भूमिका बजावतं, त्यामुळे १२ कि.मी.च्या परिघात उंच म्हणजे दीडशे-दोनशे मजल्यांहून अधिक उंचीच्या इमारती सिंगापूरमध्ये बांधता येत नाहीत म्हणून जमीन खोदून भुयारी रेल्वे, दहा-दहा मजली इमारती इथे बांधल्या जात आहेत. सिंगापूरच्या  पार्लमेन्ट हाऊसची रचना तिथल्या पब्लिक वर्क्‍स डिपार्टमेन्ट (पीडब्ल्यूडी)ने केली आहे. ते ऐकून आपल्या ‘पीडब्ल्यूडी’ने बांधलेले खड्डय़ांतून वाट शोधत जाणारे रस्ते आठवले.
सनटेक सिटी हे एक मरिना सेंटरमधील बहुउपयोगी विकास केंद्र आहे. इथली वास्तुरचना फेंगशुईच्या धर्तीवर करण्यात आली असून येथील पाच इमारती आणि कन्व्हेन्शन सेंटर अशा तऱ्हेने उभारण्यात आले आहेत की, वरून पाहताना तो डावा हात वाटावा. त्यातील ‘फाऊंटन ऑफ वेल्थ’ म्हणजे त्या हाताच्या बोटांमधली अंगठीच वाटावी. हे कारंजे कांस्य धातूचे असून धातू आणि पाणी यांच्या योग्य समतोलातून यशाचा मार्ग तयार होतो, अशी त्यामागची भावना आहे. याच्या नावाचा चिनी नावाचा अर्थ आहे- संपादन केलेले नवे यश. जगातील सर्वात मोठे कारंजे म्हणून या कारंज्याची १९९८ मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
इथल्या सिटी हॉलला १९९२ मध्ये राष्ट्रीय वारसा इमारतीचा दर्जा मिळाला. या हॉलला खूप मोठा इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने जेव्हा सिंगापूरचा ताबा मिळवला, तेव्हा नागरी कामकाज पालिका इमारतीतून चालायचे. मात्र राजकीय घडामोडीही या इमारतीत चालायच्या. याला जोडल्या गेलेल्या इतिहासाची नाळ कुठे तरी भारताशीही जुळते. ती अशी की, १९४३ मध्ये, भारतीय राष्ट्रीय सेनेचे सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जपान्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी याच पालिका इमारतीत आले होते.
इथले रस्ते असोत, इमारती असोत वा चिनी मंदिरं.. प्रत्येकाला स्वत:चा असा इतिहास आहे आणि तरीही ती अलीकडच्या काळात बांधली असावीत, इतकी अप्रतिमरीत्या जतन करण्यात आली आहेत. आपला देश, आपला इतिहास याचा रास्त अभिमान तिथल्या नागरिकांच्या वागण्या-बोलण्यातून सतत डोकावत राहतो. आमच्या सिंगापुरी टूर लीडरच्या बोलण्यातून त्याचे नेमके कारण कळले. ते असे- १८व्या वर्षी इथे मुलांनी लष्करी प्रशिक्षण घेणे सक्तीचे आहे आणि त्यानंतर दर वर्षी आपल्या वयाच्या चाळिशीपर्यंत वर्षभरातून दोन ते तीन आठवडे देशसेवा करणेही बंधनकारक आहे.. आपला देश, नागरी जीवनातील शिस्त, तिथली स्वच्छता, इतिहासाचे जतन या साऱ्याची त्यांच्यात होणारी रुजुवात इथूनच होत असावी..