परंपरेला जागणार ‘धनंजय’, ‘चंद्रकांत’! Print

प्रतिनिधी
मराठी दिवाळी अंकांमध्ये आपले आगळे स्थान निर्माण केलेल्या ‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकांचे संपादक राजेंद्र कुलकर्णी यांच्या पश्चात त्यांची परंपरा राखत यंदाही हे दोन्ही दिवाळी अंक प्रकाशित होणार आहेत.
विविध विषयांवरील कथा हे ‘धनंजय’चे तर चार ते सहा संपूर्ण कादंबऱ्या हे ‘चंद्रकांत’ वैशिष्टय़ आहे. हे दोन्ही अंक वाचकप्रिय करण्यात राजेंद्र कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता. काही महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांचे निधन झाले. या दोन्ही अंकांची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी नीलिमा सांभाळत आहेत.  ‘धनंजय’चा यंदाचा अंक सुमारे साडेतीनशे पानांचा असेल. त्यात ‘क्षणकथा’ या प्रकारच्या काही कथा वाचायला मिळतील. त्याचबरोबर विज्ञान काल्पनिका व अन्य कथा यात असतील. ‘चंद्रकांत’मध्ये यंदा सहा कादंबऱ्या असतील. ‘रारंगढांग’ या कादंबरीनंतर पुढे काय? या विषयी वाचकांना आवाहन करून त्यांच्याकडून लेखन मागविण्यात आले होते. त्यातील निवडक प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती नीलिमा कुलकर्णी यांनी दिली.