‘भगव्या' बालेकिल्ल्यावर आठवलेंची नजर! Print

मधु कांबळे
लोकसभा निवडणुकीस अद्याप दीड वर्षांचा अवधी असला तरी, मुंबईत बुधवारी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी मात्र जोरात निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही महायुतीच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दक्षिण मध्य मुंबईवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चुरस रंगणार असताना, याच मतदारसंघासाठी रामदास आठवले यांनीही चाचपणी सुरु केली आहे. मनसेला धक्का देण्यासाठी आठवले सरसावले असून त्यासाठी त्यांनी शिवेसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच साद घातली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मोर्चात इंदू मिल जमिनीच्या प्रश्नावर व दलित नेत्यांवर टीका केली. त्याला रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परप्रांतीयांचा प्रश्न असो की इंदू मिलचा प्रश्न असो, आठवले यांची भूमिका नेहमी राज यांच्या विरोधात राहिली आहे. अलीकडे राज व उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटींमुळे आठवले काहीसे अस्वस्थ आहेत. ती अस्वस्थता मेळाव्यातील त्यांच्या भाषणातून दिसली. उद्धव ठाकरे यांच्या समक्ष आरपीआयचे आमदार सुमंतराव गायकवाड यांनीही राज यांच्यावर टीका केली. आठवले यांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार उद्धव ठाकरेच आहेत, असा मुद्दाम उल्लेख केला. विशेष म्हणजे त्याला मीच बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलायला माझे खांदे अजून मजबूत आहेत, असा निर्वाळा  उद्धव यांनीही दिला.  आठवले तेवढय़ावच थांबले नाहीत, तर एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरवर सध्या मनसेचे वर्चस्व आहे, याचीही त्यांनी उद्धव ठाकरेंना आठवून करुन दिली. दादर काही कुणाची मक्तेदारी नाही, दादर आपल्याला पुन्हा उभे करायचे आहे, अशी सादही त्यांनी घातली. आठवले यांची दक्षिण-मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरु असल्याचे सांगण्यात येते. सध्या काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९८ मध्ये काँग्रेसबरोबर युती करुन आठवले लोकसभेवर निवडून गेले होते.