कंत्राटदारांअभावी प्रभागांमधील कामे ठप्प Print

जुन्यांची मुदत संपली; नव्यांनी कामे नाकारली!
 प्रतिनिधी
प्रभागांतील छोटीमोठी विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची मुदत पुन्हा एकदा संपुष्टात आल्याने आणि नव्या कंत्राटदारांनी त्यांना दिलेल्या कामांना हात न लावल्यामुळे संपूर्ण मुंबईतील कामे ठप्प झाली आहेत. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळेच ही वेळ ओढवल्याचा आरोप होत आहे. २२७ प्रभागांमधील कामे करण्यासाठी पालिकेने ११० कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. या कंत्राटदारांची मुदत संपल्यामुळे ११० ऐवजी ३० कंत्राटदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून प्रशासनाने मांडला होता. परंतु २२७ प्रभागांमधील कामे ३० कंत्राटदार कसे करणार, असा मुद्दा उपस्थित करून नगरसेवकांनी हा प्रस्ताव रोखून धरला. त्याच वेळी मुदत संपुष्टात येत असलेल्या जुन्या कंत्राटदारांना अखेर मुदतवाढ देण्यात आली. ती ३१ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात नव्या ३० कंत्राटदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निविदा प्रक्रियेचा १२० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रशासनाने नव्या कंत्राटदारांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची कामे दिली होती. त्यांना ही कामे केवळ २० दिवसांमध्ये पूर्ण करावयाची होती. मात्र त्यासाठी कोणतेही करारनामे करण्यात आले नाहीत. भविष्यात कामे मिळतील की नाहीत याबाबत साशंक असलेल्या कंत्राटदारांनी या कामांना हातच लावला नाही. निविदा प्रक्रियेची आणि दिलेल्या कामांची मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदारांच्या नियुक्तीचे काय करायचे आणि जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आता हा प्रश्न मांडण्यात येणार आहे.    

धमकी : खरी की पोकळ!
दरम्यान, ६० टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या नव्या कंत्राटदारांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार असून प्रशासन त्यांची नावे काळ्या यादीत टाकणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली. मात्र या कंत्राटदारांबरोबर प्रशासनाने कोणतेही करार केलेले नसल्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर अशी नोटीस बजावता येणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.