महिला पोलिसांनाही आता मिळणार काठया Print

प्रतिनिधी
रस्त्यावर बंदोबस्तासाठी नि:शस्त्र असणाऱ्या महिला पोलिसांना आता काठय़ा मिळणार आहेत. महिला पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांवर हल्ला केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या महिला पोलिसांना, विशेषत: वाहतूक पोलिसांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत. जे.जे. उड्डाणपुलावर बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याच्या दोन घटना घडल्या होत्या तर नागपाडा येथे महिला वाहतूक पोलिसाला मारहाण झाली होती. वाहतूक कोंडीच्या वेळी महिला वाहतूक पोलिसांची छेड काढणे, त्यांना मारहाण करून पळून जाणे सोपे असते. त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी काहीच हत्यार नसल्याने त्या हतबल ठरतात. त्यामुळे यापुढे महिला वाहतूक पोलीस तसेच बंदोबस्तावरील इतर महिला पोलिसांना स्वसंरक्षणासाठी काठय़ा देण्यात येणार असल्याचे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.  सर्वच वाहतूक पोलिसांना पिस्तुल देणे शक्य नाही. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांना पिस्तुले देण्यात आली आहेत. परंतु आता महिला वाहतूक पोलिसांना काठय़ा दिल्या तर छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसेल, असे सांगतानाच यापुढे कुठल्याही महिला पोलिसाला मारहाण झाली अथवा छेडछाड झाली तर त्याची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.