सलमानचा ‘शेरखान’ पुढच्या वर्षीची ईद गाजवणार! Print

प्रतिनिधी
alt

‘साहब थप्पडसे नही, प्यार से डर लगता है..’ हा दबंगमधला संवाद भले सोनाक्षी सिन्हाने सलमानला ऐकवला असेल पण स्वत: सलमानलाही त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाची भीती वाटायला लागली आहे. म्हणजे सलमानला आपल्या चाहते गमवायची इच्छा नाही आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. म्हणूनच पुढच्या वर्षीची ईद सलमानच्या चित्रपटाशिवाय सुनी सुनी जाणार, अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू होताच सलमानने घाईघाईत ‘शेरखान’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार अशी घोषणा के ली.
ईद आणि सलमानचा हिट चित्रपट हे समीकरण गेले तीन वर्ष चुकलेले नाही. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या त्याच्या प्रत्येक चित्रपटाने सलग शंभर कोटींच्यावर कमाई करत नवनवे विक्रमही प्रस्थापित केले. यावर्षी ‘एक था टायगर’ने तिकीटबारीवर जबरदस्त गल्ला जमवला. या यशाबरोबर आता पुढचे चित्रपटही त्याच दर्जाचे असावेत, ही जबाबदारी सलमानवर येऊन पडली आहे. ‘एक था टायगर’नंतर सलमान ‘दबंग २’ आणि ‘शेरखान’ या दोन बहुचर्चित चित्रपटांचे काम सुरू करणार आहे. हे दोन्ही चित्रपट त्याच्याच होम प्रॉडक्शनचे आहेत. ‘दबंग २’ हा बडे भैय्या अरबाझ खानची निर्मिती आहे तर ‘शेरखान’ ही छोटे सोहैल खानची निर्मिती आहे.
‘दबंग’ने सलमानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे साहजिकच ‘दबंग २’ कडून प्रेक्षकांना जास्त अपेक्षा आहे. मात्र, या चित्रपटाचे चित्रिकरण आधीच सुरू झालेले असल्याने हा चित्रपट यावर्षी २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘दबंग २’ यावर्षी प्रदर्शित होणार आणि ‘शेरखान’ला अजून सुरुवातही झालेली नाही. म्हणजे पुढच्या वर्षी ईदला त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, ईदला चित्रपट होणे आपल्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असे मानणाऱ्या सलमानला हे सहन झाले नाही. त्याने ताबडतोब सोहैलला ‘शेरखान’च्या चित्रिकरणाची तयारी करण्याची सूचना दिली. ईदला चित्रपट प्रदर्शित व्हायलाच पाहिजे, हे लक्षात घेऊन चित्रपटाचे नियोजन करा, असा आदेशच सलमानने दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीची ईद ‘शेरखान’ गाजवणार हे नक्की!