१२ वर्षांत टॅक्सी-रिक्षांच्या भाडय़ात पाच ते सात रुपयांची वाढ Print

प्रतिनिधी

गेल्या १२ वर्षांत टॅक्सीची भाडेवाढ पाच वेळा झाली असून प्रत्येकवेळी एक रुपयाने भाडेवाढ झाली आहे तर रिक्षाची भाडेवाढ सहावेळा झाली आहे. ही भाडेवाढ पहिल्या टप्प्यासाठी विशेष नसली तरी पुढच्या टप्प्यांमध्ये त्याचा विशेष फटका प्रवाशांना बसला आहे. यात २०१० मध्ये झालेली भाडेवाढ सर्वाधिक म्हणजे दोन रुपयांची झाली आहे.
भाडेसूत्र एकसमान करण्यासाठी नियुक्त झालेल्या डॉ. हकीम समितीने रिक्षा आणि टॅक्सी यांच्या सध्याच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ सुचविली होती. यास ग्राहकांनी आक्षेप घेतल्यावर आता ही भाडेवाढ रिक्षासाठी दोन तर टॅक्सीसाठी एक रुपया करण्याचे राज्य सरकारने ठरवले असून त्यावर लवकरच निर्णय होईल. १२ वर्षांतील रिक्षाची ही सातवी टॅक्सींची सहावी भाडेवाढ आहे.
७ ऑक्टोबर २००० रोजी टॅक्सीचे भाडे १२ रुपयांवरून १३ रुपये करण्यात आले. त्यानंतर १ एप्रिल २००७ ला किमान भाडे कायम ठेवून पुढच्या टप्प्याचे भाडे ८.५० ऐवजी आठ रुपये करण्यात आले. १ ऑगस्ट २००९ रोजी किमान भाडे १४ रुपये करण्यात आलेच; पण पुढच्या टप्प्याचे भाडे नऊ रुपये करण्यात आले. २४ जून २०१० ला किमान भाडे दोन रुपयांनी वाढवून १६ रुपये करण्यात आले तर पुढच्या टप्प्याचे भाडेही १० रुपये करण्यात आले. शेवटची भाडेवाढ १८ मार्च २०१२ रोजी करण्यात आली असून किमान भाडे एक रुपयाने वाढून १७ रुपये झाले तर पुढच्या टप्प्याला १०.५० इतकी वाढ करण्यात आली.
टॅक्सीच्या तुलनेत रिक्षाची भाडेवाढ एक वेळा जास्त झाली आहे. ६ ऑक्टोबर २००० रोजी रिक्षाचे किमान भाडे सात रुपयाचे आठ रुपये आणि पुढच्या टप्प्यासाठी ४.२५ रुपये करण्यात आले. ४ जून २००१ रोजी पुढच्या टप्प्याच्या भाडय़ात वाढ होऊन ते पाच रुपये करण्यात आले. १ फेब्रुवारी २००४ रोजी किमान भाडे नऊ रुपये  तर २४ जून २०१० ला  ते ११ रुपये करण्यात आले. तसेच पुढच्या टप्प्यामध्येही तब्बल दीड रुपयांची वाढ करण्यात आली. १७ ऑक्टोबर २०११ला किमान भाडे तसेच ठेवून पुढच्या टप्प्यासाठी ५० पैसे वाढविण्यात आले. २० एप्रिल २०१२ रोजी रिक्षाचे किमान एक रुपयाने वाढून ते १२ रुपये करण्यात आले.