चित्रपट प्रसिद्धीसाठी आता रेखाचित्रांचा आधार Print

प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर लागणाऱ्या ‘मालगुडी डेज’ या मालिकेच्या सुरुवातीला लागणाऱ्या संगीताइतकीच गाजलेली गोष्ट म्हणजे या मालिकेच्या नामावलीच्या वेळी दाखवण्यात येणारी रेखाचित्रे! या रेखाचित्रांनी अनेकांच्या मनात ‘मालगुडी डेज’च्या आठवणी अजूनही ताज्या ठेवल्या आहेत. आता काही चित्रपटही आपल्या प्रसिद्धीसाठी अशाच रेखाचित्रांचा आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पिपाणी’ या चित्रपटाची प्रसिद्धी अशी रेखाचित्रांमार्फतच केली जाणार आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा अशी रेखाचित्रे स्वस्त पडत असल्याने पुढेही अनेकांची पसंती या रेखाचित्रांना मिळण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘भारतीय’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यात या चित्रपटाशी निगडीत असलेल्या सामान्य माणसाचे एक प्रतीकात्मक रेखाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते. या सामान्य माणसाच्या रेखाचित्राने अनेकांचे कुतूहल चाळवल्याने चित्रपटाला त्याचा फायदा झाल्याचे चित्रपटाशी संबंधित असलेल्या अनेकांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ‘रावडी राठोड’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही छायाचित्रांचा वापर न करता भडक रंगातील चित्रांचा वापर करण्यात आला. ‘गंमत-जंमत’ आणि ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ या चित्रपटांच्या नामावलीतही रेखाचित्रांचा वापर करण्यात आला होता. आता ‘पिपाणी’ या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटातील पात्रेही रेखाचित्रांमध्ये रेखाटली गेली आहेत. ‘पिपाणी’ची प्रसिद्धी करण्यासाठी रेखाचित्रांचा वापर करण्याचे ठरल्यानंतर गजेंद्रने संपूर्ण चित्रपटाची कथा आपल्याला ऐकवली. त्यानंतर चित्रपटही थोडाफार दाखवला. त्यामुळे पात्रे, त्यांची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती यांचा सर्वाचाच अभ्यास झाला. त्यानंतर मग आम्ही ही सर्व रेखाचित्रे रेखाटली आहेत, असे रेखाचित्रकार अभय शक्ती यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर, ९९ टक्के चित्रपटांची प्रसिद्धी छायाचित्रांवरून तयार केलेल्या भित्तिपत्रकांद्वारे होते. त्यामुळे रेखाचित्रांच्या माध्यमातून थोडय़ा वेगळ्या प्रकारे प्रसिद्धी केल्यास लोकांची उत्सुकता चाळवली जाते आणि त्याचा फायदा चित्रपटाला मिळू शकतो, असे ‘भारतीय’चे प्रतीकात्मक रेखाचित्र रेखाटणाऱ्या नीलेश जाधव यांनी सांगितले.