रेल्वेमार्ग ठरतोय ‘मृत्यू मार्ग’ Print

प्रतिनिधी

रेल्वे मार्ग ओलांडून मृत्यूला आमंत्रण देऊ नका, असे भावनिक आवाहन वारंवार करूनही रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. काही ठिकाणी पादचारी पूल नाही तर काही ठिकाणी पूल चुकीच्या ठिकाणी असल्याने अनेकजण रेल्वे मार्ग ओलांडून जीव धोक्यात घालत असतात. दरवर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार व्यक्ती रेल्वे मार्ग ओलांडताना मृत्यूमुखी पडतात, असे आकडेवारी सांगते. तिन्ही रेल्वेंच्या उपनगरी गाडय़ांच्या मार्गावर दररोज किमान एकतरी अपघात होत असतो. या अपघातामध्ये सापडणाऱ्या व्यक्ती केवळ गाडीतून पडून किंवा फलाटांच्या उंचीमुळे होणाऱ्या अपघातातील नसतात. दादर, कुर्ला, ठाणे, वडाळा, डोंबिवली, कल्याण, वाशी या मध्य रेल्वेच्या तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन रोड, माहीम, बोरिवली, अंधेरी या स्थानकांजवळ रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांचे अपघात वारंवार होतात. मध्य रेल्वेवर २००९ मध्ये २२३८, २०१० मध्ये २३२१, २०११ मध्ये २१४५ प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडताना मृत्यू पावले आहेत. तर पश्चिम रेल्वेवर, २००९ मध्ये १४६८, २०१० मध्ये १३८९ तर २०११ मध्ये १३१३ प्रवासी ठार झाले आहेत. रेल्वे मार्ग ओलांडताना काहीजण आपले हात किंवा पाय गमावतात आणि कायमचे जायबंदी होतात. यंदा जानेवारीत जखमी झालेल्यांची संख्या मृत्यूमुखी पडलेल्यांपेक्षा अधिक आहे.
मध्य रेल्वेवर ३६३ तर पश्चिम रेल्वेवर २५६ व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे. रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली असून त्यांनी अनेक उपाय सुचविले आहेत.
रेल्वे मार्गामध्ये अडथळे उभारण्याव्यतिरिक्त पादचारी पूल वाढविणे, सध्याच्या पुलांची रुंदी वाढवणे आदी उपायांचा यात समावेश आहे.

या वर्षी जानेवारी महिन्यातच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (१९), दादर (२७), कुर्ला (६०), ठाणे (४५), डोंबिवली (२६), कल्याण (६३), कर्जत (९), वडाळा (३०), वाशी (४१), पनवेल (१०) असे ३३० प्रवासी ठार झाले आहेत. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट (८), मुंबई सेंट्रल (२६), वांद्रे (१४), अंधेरी (१८), बोरिवली (५९), वसई (२८) आणि पालघर (२१) असे १७४ जण मृत्यूमुखी पडले आहेत.