स्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार! Print

प्रतिनिधी, शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

पादचाऱ्यांच्या सोयीचे कारण देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महानगर प्रदेशातील रेल्वेस्थानकांजवळ ‘स्कायवॉक’ बांधण्याचा शेकडो कोटींचा वादग्रस्त प्रकल्प राबवला खरा; पण शीव, भांडुप, कांजूरमार्ग असे दोन-पाच नव्हे जवळपास १३ स्कायवॉक अत्यल्प वापरामुळे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यापोटी तब्बल २७७ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. राज्यात पायाभूत सुविधांच्या नावाखाली कंत्राटदारांच्या विकासाचा कार्यक्रम कसा चालतो हेच त्यामुळे अधोरेखित झाले आहे. मुंबई शहर-उपनगर आणि त्याचबरोबर महानगर प्रदेशातील प्रवासाचे मुख्य साधन उपनगरी रेल्वे असल्याने लाखो लोक रोज घर ते रेल्वेस्थानक व पुढे कार्यालयाच्या ठिकाणी आणि उलट असा प्रवास करतात. पण रेल्वेस्थानके फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होतो. शिवाय काही ठिकाणी महामार्गही ओलांडावे लागतात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रेल्वेस्थानकांभवती स्कायवॉक बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. मात्र लोकांच्या सोयीसाठीच्या प्रकल्पाचे रूपांतर कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या सोयीच्या कामात होते ही परंपरा याही बाबतीत कायम राहिली. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य नियोजन, अभ्यास न करताच, लोकांची गरज लक्षात न घेताच ‘स्कायवॉक’ची आखणी झाली. त्यामुळे चांगल्या हेतूने राबवलेला हा प्रकल्प वादग्रस्त ठरला आणि त्याचा बोऱ्या वाजला. ‘स्कायवॉक’वरून मोठा वाद झाल्याने प्राधिकरणाने वर्षभरापूर्वी त्यांच्या वापराबाबतचे एक सर्वेक्षण केले. तसेच अनेक नियोजित कायवॉक रद्द केले. प्राधिकरणाने केलेल्या शेवटच्या सर्वेक्षणानुसार रोज सुमारे १२ लाख १० हजार लोक एकूण ३६ स्कायवॉकचा वापर करतात. दरवर्षी त्यात सुमारे दीड-दोन लाख वापरकर्त्यांची भर पडते. त्यानुसार सध्या फार तर १४ लाख लोक वापर करत आहेत.  पण त्याचवेळी कांजूरमार्ग (पाच कोटी २५ लाख रुपये), बदलापूर पूर्व (१० कोटी ८८ लाख), बदलापूर पश्चिम (नऊ कोटी ८८ लाख), भाईंदर (२१ कोटी ३३ लाख), अंधेरी पूर्व (३० कोटी), वसई रोड (१८.१३ कोटी), शीव (१८.७७ कोटी), ग्रांट रोड (५०.४८ कोटी), ठाणे पूर्व (४० कोटी ६६ लाख), भांडुप पश्चिम (१५ कोटी ६३ लाख), अंबरनाथ पश्चिम (सहा कोटी ३२ लाख), कांदिवली पूर्व (३४ कोटी ६२ लाख), गोरेगाव पश्चिम (१५ कोटी ५४ लाख) असे एकूण २७७ कोटी ४९ लाख रुपयांचे हे १३ स्कायवॉक फारसे वापरले जात नाहीत याची कबुली प्राधिकरणाने सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार दिली. कल्याण पश्चिम, सांताक्रूझ येथील स्कायवॉक रोज सुमारे दीड लाख लोक वापरत असल्याने यशस्वी ठरले. बोरिवली, उल्हासनगरचे स्कायवॉक रोज सुमारे पाऊणलाख लोक वापरतात. त्याचवेळी प्राधिकरणानेच अल्प वापराची कबुली दिलेल्या या १३ स्कायवॉकचा रोज वापर करणाऱ्यांची संख्या ही ७ ते २० हजारांच्या घरात आहे. वापरातील ही तफावत लक्षात घेतली की फारसा विचार न करता बांधले गेलेले हे १३ स्कायवॉक म्हणजे २७७ कोटींचे भंगार ठरले आहेत.     

*  मुंबई महानगर प्रदेशात एकूण ५० स्कायवॉक बांधण्याचा प्रकल्प ‘एमएमआरडीए’ने २००७ मध्ये हाती घेतला.
*  सर्व ५० स्कायवॉकसाठी एकूण ६०७ कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज होता.
*  नंतर बऱ्याच ‘स्कायवॉक’वरून स्थानिक रहिवासी, व्यापारी असे वाद झाल्याने अखेर २०१० पर्यंत ३६ स्कायवॉक प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आले.
* अल्प उपयोग होणारे स्कायवॉक कांजूरमार्ग, बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम, अंधेरी पूर्व, वसई रोड, शीव, भाईंदर, ग्रांट रोड, ठाणे पूर्व, भांडुप पश्चिम, अंबरनाथ पश्चिम, कांदिवली पूर्व, गोरेगाव पश्चिम.