‘विकासाला विवेकाची जोड हवी’ Print

प्रतिनिधी
विकास आणि प्रगती आवश्यक असली तरी त्यासाठी काय किंमत मोजावी लागते त्याचा विचार करून विकासाला विवेकाची जोड देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गुरुवारी येथे केले. समाजातील श्रीमंत वर्ग आणि सत्ताधारी मंडळी समाज घडवत नाही तर बिघडवतात. सध्या उत्पादकता आणि मेहनतीला नव्हे तर बेशरमपणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असून आजचे राजकीय नेते हे ‘लीडर’ नव्हे तर ‘डीलर’ असल्याचे परखड मतही धर्माधिकारी यांनी या वेळी नोंदवले.
अमरिलीज आणि मंजुल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी लिखित ‘म्युझिक ऑफ द स्पिनिंग व्हिल- महात्मा गांधी मॅनिफॅस्टो फॉर द इंटरनेट एज’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
धर्माधिकारी यांच्यासह सुधींद्र कुलकर्णी, ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, ‘टाटा सन्स लिमिटेड’चे कार्यकारी संचालक आर. गोपालकृष्णन, गीतकार प्रसून जोशी, मंजुल प्रकाशनचे विकास राखेजा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे अनुपस्थित होते. पुस्तकाविषयी त्यांचे मनोगत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
गडकरी यांनी सांगितले की, कुलकर्णी यांचे हे पुस्तक महात्मा गांधींविषयी आपल्याला नवी दिशा आणि दृष्टी देणारे आहे. गांधीजी हे विज्ञान-तंत्रज्ञान व आधुनिकीकरणाच्या विरोधात नव्हते. तरुणांनी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि गांधी यांचे विचार व मूल्य एकत्र आणून बलशाली भारतासाठी प्रयत्न करावे. नव्या पिढीसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. आपले मनोगत व्यक्त करताना अंबानी म्हणाले की, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या विचारांचा अधिक वेगाने प्रसार होण्यास मदत होईल. कुलकर्णी यांचे हे पुस्तक तरुणांसाठी आहेच; पण महात्मा गांधी यांच्याविषयी एक संदर्भ ग्रंथ म्हणूनही ते मैलाचा दगड ठरले आहे. आर. गोपालकृष्णन यांनी आपल्या मनोगतात इंटरनेट व चरखा यातील साम्य उलगडून दाखवले.
या वेळी ‘महात्मा गांधीज् मॉरल फिलॉसॉफी अ‍ॅण्ड द प्रॉमिस ऑफ द इंटरनेट एज-आर दे मेड फॉर इच आदर’ या विषयावर प्रसून जोशी यांनी वक्त्यांना काही प्रश्न विचारले.