मॅनहोल व खड्डय़ांमध्ये पडून जखमी होणाऱ्यांना नुकसानभरपाई नाही Print

प्रतिनिधी
‘खड्डय़ांतील’ रस्ते आणि मॅनहोलमध्ये पडून जखमी होणाऱ्या मुंबईकरांना नुकसानभरपाई देण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. या संदर्भात ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने या संदर्भातील अभिप्राय दफ्तरी दाखल करण्यास भाग पाडावे, असे आवाहन माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी काँग्रेस नगरसेवकांना केले आहे.
झाडे उन्मळून, खड्डय़ात अथवा झाकण नसलेल्या मॅनहोलमध्ये पडून जखमी अथवा मरण पावणाऱ्या मुंबईकरांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी महापालिकेने योग्य ती तरतूद करावी, अशी ठरावाची सूचना तत्कालीन नगरसेवक विनोद शेखर यांनी २० ऑक्टोबर २०११ रोजी मांडली होती. सुमारे एक वर्षांनंतर त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय सादर करण्यात आला आहे.
मॅनहोलवरील झाकणे तुटून अथवा चोरीला गेल्यामुळे अपघात होत असून त्यात अनेकजण जखमी होत आहेत. हे अपघात टळावेत यासाठी संबंधित विभागांकडे पुरेशी झाकणे उपलब्ध करण्यात येत आहेत. एखाद्या ठिकाणचे झाकण तुटलेले अथवा गायब झाल्याचे आढळल्यास ते तात्काळ बदलण्यात येते. मुख्य मलवाहिनी विभागाच्या प्रत्येक नियंत्रण कक्षाच्या पर्यवेक्षकाकडे अतिरिक्त झाकणांचा साठाही उपलब्ध करण्यात आला आहे, असा अभिप्राय प्रशासनाने सादर केला आहे. मात्र जखमी अथवा मृतांच्या नातेवाईकांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासन उदासीन असून ते मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा अभिप्राय दफ्तरी दाखल करावा आणि अशा दुर्घटनांमध्ये जखमी वा मृत होणाऱ्या मुंबईकरांच्या नातेवाईकांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी विनोद शेखर यांनी केली आहे.