माधवन म्हणतो, ‘शाकाहारच बरा’ Print

‘पेटा’साठी केली ‘ग्लास वॉल्स’ नावाची चित्रफीत
 प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टी आणि प्राणी यांचे नाते खूपच सलोख्याचे आहे. गेलाबाजार एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता, आपण प्राण्यांवर किती प्रेम करतो, हे आवर्जून सांगतात. काही महिन्यांपूर्वी घोडागाडय़ांविरोधात झीनत अमानने आवाज उठवून प्रसिद्धी पदरात (?) पाडून घेतली होती. आता आर. माधवन थोडे वेगळे कारण घेऊन मैदानात उतरला आहे. प्राण्यांच्या कत्तलीविरुद्ध आणि मांसाहाराविरुद्ध त्याने आवाज उठविला आहे. मांसाहार बंद करून आपल्या चाहत्यांनीही आपल्याप्रमाणे शाकाहाराला चालना द्यावी, असा सल्लाही त्याने दिला आहे.
प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ‘पेटा’ संस्थेसाठी माधवनने नुकतेच ‘ग्लास वॉल्स’ नावाच्या चित्रफितीचे चित्रिकरण केले. ही चित्रफीत करता करता तो स्वत:च प्राणीमित्र झाला. ‘जागतिक शाकाहार दिन’ आणि ‘शाकाहार जागृती महिना’ या दोन्हीच्या औचित्याने सर्वानी शाकाहाराचा स्वीकार करावा, असा संदेश या चित्रफितीद्वारे देण्यात आला आहे.माधवनचे घर दक्षिण भारतातील अतिशय कर्मठ घराणे आहे. आमच्या घरात मांसाहार होत नाही. स्वाभाविकच मीसुद्धा पक्का शाकाहारी आहे.
कत्तलखान्यात नेमके काय होते, हे कोणाही मांसाहारीने पाहिले, तर त्याची मांसाहारावरची वासनाच उडून जाईल, असे माधवनचे मत आहे. ‘थ्री इडियट्स’मध्ये वन्यजीवन छायाचित्रकाराची भूमिका साकारलेल्या माधवनला मांसाहारामुळे प्राण्यांना होणाऱ्या यातनांचीही जाणीव आहे. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही वेदना होतात. कत्तलखान्याचा वासही आला, तरी प्राणी भयभीत होतात, मानेवरून सुरी फिरल्यावरही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा मृत्यूशी झगडा चालू असतो. अशा प्रकारे एखाद्या जिवाला हानी पोहोचवून पोट भरणे त्रासदायक आणि दुर्दैवाचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वच चाहत्यांना आपण शाकाहारी होण्याबाबत आवाहन करतो, असे माधवनने स्पष्ट केले.
आर. माधवनच्या या प्राणीप्रेमामुळे आता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्राणीप्रेमींच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे.