या सम हाच! Print

फिल्लमबाज

मनोरंजन याचा शब्दार्थ लिहायचा म्हटला तर त्यात कुठल्या कुठल्या विलक्षण गोष्टी येऊ शकतात, ते सारे काही सिंगापूरच्या एकाच ठिकाणी एकवटल्या आहेत, याची प्रचीती आज सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिलेल्या मराठी कलावंतांना आली. मनोरंजनाच्या नाटय़, चित्रपट, क्रीडा अशा विविध प्रकारांमध्ये अद्ययावत तंत्राचा नेमका वापर कसा करता येईल, याचे हा स्टुडिओ म्हणजे चालतेबोलते उदाहरणच म्हणावे लागेल. इथला युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणजे सेन्तोसा बेटावरील रिसॉर्ट वर्ल्डमध्ये उभारलेले एक थीम पार्क आहे. आशियातलं दुसरं (पहिले जपानमध्ये आहे) आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधलं पहिलंवहिलं असं हे थीम पार्क. तब्बल ४९ एकर जमिनीवर वसवल्या गेलेल्या या स्टुडिओत वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित असे सात विभाग आहेत आणि त्यात लक्ष वेधून घेणारी २४ आकर्षणे आहेत. इथला प्रत्येक विभाग हा एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटावर अथवा टेलिव्हिजन शोवर आधारित आहे. त्या चित्रपटाचे अथवा शोचे वैशिष्टय़, त्यातील पात्रांची उपस्थिती, भोवताली त्यासारखा माहोल, खाणे व शॉपिंग अशी प्रत्येक विभागाची रचना आहे.
या स्टुडिओत ‘लाइट कॅमेरा अ‍ॅक्शन’सारखा स्टीव्हन स्पीलबर्गने सादर केलेला अफलातून शो आहे, ज्यात आपल्यासमोर सादर केल्या जाणाऱ्या १० मिनिटांच्या नाटय़ात वादळ, गडगडाट, पाऊस, उसळलेला आगीचा लोळ हे सारे काही होत असते आणि शेवटी एक अतिभव्य नौकाही येऊन उभी ठाकते. नाटय़ या प्रकारात काय काय येऊ शकते, याचा अंदाज यातून येतो.
ज्युरासिक पार्क आणि वॉटरवर्ल्ड या संकल्पनेवर उभारण्यात आलेला ‘दि लॉस्ट वर्ल्ड’मधला अनुभव केवळ अविस्मरणीय.
‘ड्रीमवर्क अ‍ॅनिमेशन’च्या ‘श्रेक’मध्ये भेटणारे ‘फार फार अवे’ आपल्याला इथे भेटते तर मादागास्कर विभागातही आपल्याला भरकटत गेलेली मालवाहू नौका मादागास्करला पोहोचल्यानंतर तिथल्या साहसी सफरीचा अनुभव देते. ‘मादागास्कर’ चित्रपटातील एकाहून एक सरस अशी सारी अ‍ॅनिमेटेड पात्रं इथे भेटतात.
उदा. बॅटलस्टार गॅलेक्टिका हा ‘श्रेक’ चित्रपटावर आधारित १५ मिनिटांची थ्रीडी फिल्म दाखवली जाते. हा अनुभव म्हणजे प्रेक्षकांना शब्दश: चिंब भिजवणारा ठरतो. समोर पडद्यावर जेव्हा पाणी उसळते तेव्हा सर्व प्रेक्षकांच्या अंगावरही पाण्याचे तुषार उडतात, जमीन हादरते तेव्हा आपली खुर्ची हलायला लागते अशी या सिनेगृहाची रचना करण्यात आली आहे. ‘मॉन्स्टर रॉक’मधील छोटेखानी किल्ला आहे- जिथे युनिव्हर्सल मॉन्स्टर असणारा एक म्युझिकल शो सादर केला जातो.
युनिव्हर्सल स्टुडिओमधील ‘हॉलीवूड थीम’मध्ये अगदी हॉलीवूडसारखी वास्तुशास्त्रीय रचना करण्यात आलीय आणि तिथल्या ओळीने असणाऱ्या पामच्या झाडांमधून ‘वॉक ऑफ द फेम घेणं’ हा अनुभव म्हणजे खासच अनुभव!  ‘न्यूयॉर्क थीम’ची रचना अगदी अलीकडच्या काळातील न्यूयॉर्क शहरातील वैशिष्टय़ांवर आधारित आहे. न्यूयॉर्क शहरातील साइडवॉक आणि त्या शहरातील क्लासिक लॅण्डमार्क हुबेहूब वठवले आहेत.
‘साय-फाय सिटी’ विभागात भविष्यातील शहरे आणि महानगरे कशी असतील, या कल्पनेवर आधारित रचलेले थीम पार्क आहे, जे अवकाश युगातील तंत्रज्ञानावर आणि आधुनिक तंत्राच्या साहाय्याने सज्ज आहे. प्राचीन इजिप्त या विभागात इजिप्तमधील सोनेरी काळातील शाही इजिप्शियन वास्तुशास्त्र आणि कलांच्या प्रतीकांची मांडणी करण्यात आली आहे.
म्हैसकर-मिफ्ता पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेली युनिव्हर्सल स्टुडिओची सफर म्हणजे साऱ्या कलावंतांसाठी, तंत्रज्ञांसाठी एक वेगळा अनुभव होता, हे निश्चित!