नवरात्रीत पाऊस करणार बेरंग? Print

प्रतिनिधी

मोसमी पाऊस आता परतीच्या प्रवासाला लागला असल्याचे वेधशाळेकडून सांगितले गेले असले तरी परतीच्या पावसाचा मुक्काम यंदा नवरात्र व दसऱ्यापर्यंत राहणार असल्याचा अंदाज पारंपरिक आडाखे आणि पंचांगानुसार व्यक्त केला जात आहे. तसे खरेच झाले तर दांडियाच्या उत्साहावरही पाणी पडण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात पावसाने विश्रांती घेतली होती. त्याच दरम्यान वेधशाळेकडूनही मोसमी पाऊस मुंबई आणि राज्यातून परतीच्या प्रवासाला लागला असल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे पाऊस संपला, असे वाटू लागले असतानाच मुंबईकरांना १ ऑक्टोबरला पावसाने चांगलाच दणका दिला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने हवेतही सुखद गारवा निर्माण झाला. त्यानंतर एक-दोन दिवसाआड संध्याकाळी पाऊस हजेरी लावतो आहे.
भारतीय पंचांग आणि पारंपरिक आडाख्यांनुसार हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाळ्याची शेवटची तीन नक्षत्रे मानली जातात. या तीन नक्षत्रांच्या काळात पाऊस कमी पण अधूनमधून जोरदार कोसळतो. सध्या हस्त नक्षत्र सुरू असून ते येत्या ९ ऑक्टोबपर्यंत आहे. १० ऑक्टोबर रोजी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असून त्याचे वाहन मेंढा आहे. २३ ऑक्टोबर रोजी सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे पंचाग आणि पारंपरिक अंदाजानुसार या नक्षत्रात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
स्वाती नक्षत्र ५ नोव्हेंबपर्यंत आहे. ६ नोव्हेंबर रोजी सूर्य विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. विशाखा नक्षत्रात पाऊस पडत नाही. त्यामुळे परतीचा हा पाऊस ५ नोव्हेंबपर्यंत राहील, असा आडाखा व्यक्त केला जातो. सध्या पडणारा पाऊस भातशेतीसाठी हानिकारक असून तयार होत आलेल्या पिकाचे त्यामुळे नुकसान होऊ शकते. याविषयी आपल्याकडे ‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ ही म्हण आहे. स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस भातकापणीनंतर होणाऱ्या पिकांना उपयुक्त असतो. त्यामुळे ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ ही म्हण तयार झाली असल्याचेही सोमण म्हणाले.