आंबटशौकीन वाढले! Print

सीएसटी आणि कल्याण स्थानके सर्वात धोकादायक
सुहास बिऱ्हाडे, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

अव्याहत धावणाऱ्या मुंबईत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरटा स्पर्श आणि धक्काबुक्की करणाऱ्या आंबटशौकींनाच्या संख्येत वाढ झाली आहे. गर्दीत घाईने प्रवास कणाऱ्या महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना जाणीवपूर्वक धक्के मारणे, चोरटा स्पर्श करणे असे प्रकार वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे रेल्वे व पोलिसांनी याविरोधात मोहीम आखली असून संबंधित महिला पुढे आल्यास या प्रकारांना परिणामकारकपणे आळा बसू शकतो. रेल्वेने चालू वर्षांत सप्टेंबपर्यंत छेडछाडीचे १३५ आणि विनयभंगाचे १८ गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईत १३० रेल्वे स्थानके असून १७ रेल्वे पोलीस ठाणी आहेत. दररोज तिन्ही मार्गावर लाखो महिला प्रवास करतात. मिनिटांवर त्यांची गणिते ठरलेली असतात. त्यामुळे गर्दीतून वाट काढत, जिने चढत, प्लॅटफॉर्म बदलत धावाधाव करणे हे त्यांचे प्राक्तनच आहे. याचाच फायदा घेत गर्दी आणि धावपळीच्या वेळेला आंबटशौकीन त्यांना धक्के मारणे, चोरटा स्पर्श करणे, छेडछाड करणे आदी प्रकार करीत असतात. हे आंबटशौकीन गर्दीत मिसळून पुढे निघून जातात. घाईत असल्याने महिला अशा आंबटशौकीनांना पकडूही शकत नाहीत. बदनामीची भीती वेगळीच! परंतु रेल्वे पोलिसांच्या पथकाने अशा आंबटशौकीनांवर खास नजर ठेवली आहे. चालू वर्षांत आतापर्यंत रेल्वे पोलिसांनी अशा १३५ आंबटशौकीनांना अटक केली आहे. तर धाडस करून ज्या महिला समोर आल्या होत्या त्यांच्या तक्रारीवरुन १८ जणांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वेच्या महिला आणि बाल विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी यासंदर्भात सांगितले की, छेडछाड झाली तरी महिलांना तक्रार करायला वेळ नसतो आणि मानसिकताही नसते. आम्ही खास पथक नेमून अशा आंबटशौकींनावर कारवाई चालू केली आणि १३५ लोकांना अटक केली. न्यायालयात हजर केली. परंतु जर महिला तक्रार करायला पुढे आल्या तर विनयभंगासारखे कडक कलम लावून कारवाई करता येते.
सीएसटी आणि कल्याण स्थानकांमध्ये छेडछाडी आणि विनयभंगाच्या घटना सर्वात जास्त घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. कल्याणला ४७ तर सीएसटी स्थानकात २१ गुन्हे घडले आहेत. ज्या महिलांना असा त्रास सहन करावा लागतो त्यांनी धाडसाने पुढे यावे, असे आवाहन पाल यांनी केले आहे.