सत्तरावा वाढदिवसही इतर दिवसांसारखाच.. Print

प्रतिनिधी
alt

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस कसा असेल, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीला लागली आहे. अमिताभ यांचा वाढदिवस कसा साजरा होणार, या बाबतच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र आपला सत्तरावा वाढदिवस हा माझ्यासाठी अन्य दिवसांसारखाच आहे, असे सांगत या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला आहे. एकीकडे भारतीय सिनेमाचे शतक आणि दुसरीकडे याच सिनेमाचा महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस हा सिनेप्रेमींसाठी दुग्धशर्करा योग आहे. ११ ऑक्टोबरला सत्तरी पूर्ण करणाऱ्या अमिताभसाठी जया बच्चन आणि फॅशन डिझायनर जोडी अबु जानी, संदीप खोसला यांनी मोठी पार्टी आयोजित केली असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर अमिताभचे चित्रपटसृष्टीतील योगदान काय आहे, याची झलक पोस्टर्स, पेंटिंग्जच्या माध्यमातून सादर करावी, अशीही जया बच्चन यांची इच्छा आहे. अर्थात, नक्की कशाप्रकारे हा वाढदिवस साजरा केला जाणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
अमिताभ यांनी मात्र या बातम्या, चर्चा, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांची दखल घेतली आहे. ‘कितीतरी मुलाखती, कितीतरी सदिच्छा आणि असेच काम करत राहा हा शुभसंदेश... माझा सत्तरावा वाढदिवस काहीजणांसाठी फारच विशेष आहे असे वाटते. मला विचाराल तर माझ्यासाठी तो अन्य दिवसांसारखाच एक दिवस आहे’, असे ट्विट करून अमिताभ यांनी चाहत्यांची विकेट घेतली आहे.