एकमेका साह्य़ करूनच.. Print

ज्येष्ठांच्या एकाकीपणावर मानसशास्त्रज्ञांचा तोडगा
प्रतिनिधी
alt

सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक या सर्वच स्तरांवर सहसा ज्येष्ठ नागरिक परावलंबी बनतात. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा ते नैराश्याकडे झुकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे गट खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. अनेकदा या सर्व प्रकारच्या नैराश्यावर मात करण्याची ताकद त्यांना या गटांमधून मिळू शकते, असे मानसशास्त्रज्ञांना वाटते. ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक दुर्बलतेची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख गौतम गवळी आणि केईएम रुग्णालयातील मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. जयंत आपटे यांनी ‘वृत्तान्त’शी संवाद साधला. गौतम गवळी यांच्या मते मानसशास्त्रातली ‘एम्प्टी नेस्ट’ ही समस्या वृद्धांना खूप मोठय़ा प्रमाणात भेडसावते. आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी प्रसंगी स्वत:कडेही दुर्लक्ष करणाऱ्या पालकांना ते ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आणि मुले मोठी झाल्यावर त्यांनी दूर जाणे असह्य़ होते. आजकाल संपर्कक्रांतीमुळे संपर्क प्रस्थापित होत असले, तरी ही एकलेपणाची भावना कायम असते, असेही गवळी यांनी नमूद केले.तर, निवृत्तीनंतर पुरुषांना एकप्रकारचे रिकामपण येते. बायकांच्या बाबतीत हे रिकामपण मुलाचे लग्न झाल्यावर आणि घरात सूनेने स्वयंपाक घराचा ताबा घेतल्यावर येते. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आणि त्यातून या सर्व मानसिक समस्या निर्माण होतात, असे डॉ. आपटे यांनी सांगितले. बऱ्याचदा मुले आपल्या आईवडिलांना करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर नातवांचा सांभाळ करण्यापुरते जवळ करतात. मात्र त्यानंतर त्यांना अडगळीत टाकले जाते.
त्यामुळे या ज्येष्ठांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो, असेही ते म्हणाले. ज्येष्ठांच्या हत्यांमागे संपूर्ण समाज जबाबदार आहे. ज्येष्ठ नागरिक ही समाजाची जबाबदारी आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने समाजाच्या जडणघडणीत काही ना काही वाटा उचलला असतो. त्यामुळे त्यांची सुरक्षा आणि निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य निर्धोक जावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे या दोन्ही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वयोवृद्धांना एकाकी वाटू नये म्हणून ‘हास्यकट्टा’ किंवा ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ अशा उपक्रमांना चालना देण्याची गरज आहे. त्यामुळे समानशीलांच्या घोळक्यात या वृद्धांना आधार मिळतो. एकमेकांची सुखदुखे वाटता येतात. त्यामुळे त्यांचा एकटेपणा आणि पर्यायाने मानसिक समस्या दूर होतील, असे मत डॉ. आपटे यांनी व्यक्त केले.मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपण केस स्टडी म्हणून अशा वयोवृद्धांना भेटण्यास, त्यांच्या समस्या जाणून घेण्यास आम्ही सांगतो. त्यामुळे या वृद्धांनाही आपले म्हणणे सांगण्यासाठी कोणीतरी समोर मिळते आणि विद्यार्थ्यांनाही त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, असे गवळी म्हणाले.

पोलिसांची मदत परिणामकारक
मुलगा-सून यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याएवढा त्राण ज्येष्ठ नागरिकांमध्ये नसतो. त्यामुळे अनेकदा ‘ठेविले अनंते.’ही भूमिका ते घेतात. आरोग्यविषयक प्रश्न, विरंगुळा, करमणुकीचे कार्यक्रम, महिन्यातून दोन-तीनदा भेटी घेणे यातून ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या सदस्यांचे प्रश्न सोडवू शकतात. परंतु, बहुतांशी ज्येष्ठांचे तुटपुंजे पेन्शन, त्यामुळे उद्भवणारे आर्थिक प्रश्न यातून ‘आपल्याला कोणी विचारत नाही’ ही भावना दृढ होते. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न असतात. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक संघांची भेट घेतली तर एकाचवेळी शंभर-सव्वाशे ज्येष्ठ मंडळी भेटू शकतील. त्यातून सुरक्षिततेच्या प्रश्नावर जनजागृती करता येईल.
* सुरेश गुप्ते - अधक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, ठाणे

सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बैठका घेतात. परंतु, त्यामध्ये अनेकदा ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी नसतात. मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक संघांची संख्या जवळपास १०० आहे. त्यांच्या समन्वयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योजना राबविली तर अधिक प्रभावी ठरेल. जनजागृतीची गरज अजूनही खूप आहे.
* मधुकर कुलकर्णी - वरिष्ठ उपाध्यक्ष, अ. भा. ज्येष्ठ नागरिक संघटना