आधार खाकी वर्दीचा! Print

सुहास बिऱ्हाडे
alt

‘पोलीस नियंत्रण कक्ष? कुणी पोलीस आहे का माझ्याशी बोलायला? एकटय़ाला करमत नाहीये..’ काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका ज्येष्ठ नागरिकाने दूरध्वनीवरून केलेल्या या करुण मागणीने पोलीसदल हेलावले. मुंबईतले वृद्ध किती एकाकी जीवन जगतात याचे हे उदाहरण बोलके ठरावे. हा किस्सा खुद्द गृह मंत्र्यांकडे गेला आणि वृद्धांच्या मदतीसाठी आता पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. मुंबईत वरिष्ठ नागरिकांच्या हत्या, त्यांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्यावर चोरीसाठी हल्ले आदी घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. मुंबईत अनेक वृद्ध एकटे राहातात. त्यांची मुले कामानिमित्त अन्यत्र असल्याने ते एकटे राहतात. तर काहींची  मुले दिवसभर नोकरीसाठी बाहेर असल्याने त्यांना दिवसभर घरात एकटे राहावे लागते. त्यांच्या याच एकटेपणाचा फायदा गुन्हेगार घेतात. त्यामुळेच वृद्धांवर चोरीसाठी हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वृद्धाच्या या एकटेपणाची दाखल घेतली आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाने पुढाकार घेतला. यापूर्वी वरिष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सेवा होती. आता खुद्द पोलिसांनी वरिष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचे ठरवले आहे. या नव्या योजनेचा शुभारंभ आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी नुकताच केला. प्रत्येक पोलीस ठाण्याने आता आपल्या हद्दीतील वरिष्ठ  नागरिकांच्या नोंदी ठेवायच्या आहेत. ‘बीट मार्शल’ या वृद्धांच्या घरात महिन्यातून एकदा जाऊन त्यांची विचारपूस करणार आहे. वृद्धांच्या घरात कोण येते, त्यांना कोण भेटते यावर लक्ष ठेवले जाणार आहे. वृद्धांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. हा अहवाल प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपासणार असून खुद्द गृहमंत्री त्यावर लक्ष ठेवणार आहेत.एकटे राहणाऱ्या वृद्धांकडे पोलिसांची ये-जा सुरू झाल्याने गुन्हेगारांना वचक बसू शकेल. तसेच वृद्धांमधील एकटेपणाची, एकाकीपणाची भावनाही कमी होऊ शकेल, असा विश्वास या योजनेमुळे पोलिसांना वाटत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवडय़ात एकाकी राहणाऱ्या साडेचार हजार वृद्धांची नोंद करण्यात आली. ही संख्या वाढत आहे. मुंबई पोलिसांचा हा प्रयोग निश्चितच अभिनव आहे.     

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ
मुंबईसह संपूर्ण राज्यभरात विविध ज्येष्ठ नागरिक संघ काम करत आहेत. या सर्व संघांची ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ’ (फेसकॉम) ही शिखर संघटना असल्याची माहिती संघाच्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या माजी अध्यक्ष स्वाती आगरकर यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. मुंबई शहर, उपनगरे तसेच अन्य जिल्हे, तालुके येथे काम करणारे विविध ज्येष्ठ नागरिक संघ या महासंघाशी जोडलेले आहेत. मुंबईतील असे ९८ ज्येष्ठ नागरिक संघ या महासंघाशी जोडले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी योग शिबीर, वैद्यकीय उपचार व निदान शिबीर, मेळावे असे विविध कार्यक्रम या संघांतर्फे आयोजित केले जातात. संपर्क-९७६९०११५२२    

मुंबईतील ज्येष्ठ नागरिक संघ
* नंदादीप ज्येष्ठ नागरिक सेवा संघ-चुनाभट्टी (विजय-२४०५००७५)
* शिवसृष्टी ज्येष्ठ नागरिक संघ- कुर्ला (पी. एन. दाबके-२५२३५७०३)
* सिनिअर सिटिझन्स फोरम-महालक्ष्मी (के. आर. सामंत-२८२४९७४१)
* ऐरोली सिनिअर सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशन (मधुकर पाडळे-९२२४३०५२६१)
* ज्येष्ठ नागरिक संघ-नेरुळ (केशव साठय़े-२७७११९९१)
* सनिअर सिटिझन्स असोसिएशन, भांडूप (कांचन शिंदे-२५९५१६२९)
* ज्येष्ठ नागरिक संघ-मुलुंड (चंद्रकांत खरे-२५६०२५४३)
* ज्येष्ठ नागरिक संघ-माहीम (डॉ. रमेश शेटे-२५६०२५४३)
* ज्येष्ठ नागरिक संघ-बोरिवली (काशिनाथ कोरगावकर-२८०८४००६)
* ज्येष्ठ नागरिक संघ-लालबाग (अश्विनी गावडे-९३२४३६२४७७)