वृद्धेची नातवाविरुद्ध तक्रार Print

‘निर्वाह खर्चा’साठीचा पहिला अर्ज मुंबईत दाखल
रेश्मा शिवडेकर
alt

कायद्याचे पाठबळ आणि हिंमत देणाऱ्या शब्दांचा आधार मिळाला की वयाच्या ८०व्या वर्षीही अन्यायाविरोधात लढण्याची ताकद कशी मिळते हे पाल्र्याच्या आनंदीबाई बेंडले यांनी दाखवून दिले आहे.आनंदीबाईंचे राहते घर नातवाने बळकावले आहे. नातवाच्या या विश्वासघातामुळे आनंदीबाईंना कशाचाच आधार राहिला नाही. पण, आनंदीबाई खचल्या नाही. ‘हेल्पेज इंडिया’ या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या मदतीने त्यांनी ज्येष्ठांच्या भल्यासाठी असलेल्या कायद्याचा आधार घेऊन नातवाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘मेटेनन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर ऑफ पेरेन्ट्स अ‍ॅण्ड सिनिअर सिटिझन्स अ‍ॅक्ट’ या कायद्याअंतर्गत सरकारदरबारी न्याय मागणाऱ्या आनंदीबाई या मुंबईतील पहिल्या ज्येष्ठ नागरिक ठरल्या आहेत.
आनंदीबाईंनी वांद्रे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला असून घराबरोबरच निर्वाह खर्चाची रक्कम नातवाकडून मिळावी, अशी मागणी केली आहे. ३ सप्टेंबर रोजी आनंदीबाईंनी केलेल्या अर्जाची सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार तड लावल्यास तीन महिन्याच्या आत आनंदीबाईंना त्यांचे घर परत मिळू शकते आणि उदरनिर्वाहासाठी दरमहा आर्थिक तरतूद करणेही त्यांच्या नातवाला भाग पडू शकते, असे ‘हेल्पेज’चे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.
या कायद्यात ज्येष्ठांच्या तक्रारींची तीन महिन्यांत तड लागावी यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद आहे. पण, न्यायाधिकरणाची निर्मिती करण्यासच सरकारने दोन वर्षे घेतली. ‘६ फेब्रुवारी, २०१२ला आदेश काढून सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ासाठी विभागीय न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली. परंतु, सर्वसामान्यांमध्ये जाणीवजागृती न केल्याने तब्बल सात महिन्यांनी या कायद्याअंतर्गत तक्रारीची नोंद होऊ शकली,’ अशी प्रतिक्रिया बोरगावकर यांनी दिली. बेंडले यांच्या तक्रारीबाबत संबंधितांना नोटीस पाठविली गेली आहे का असे विचारले असता उपविभागीय अधिकारी अजित साखरे यांनी माहिती देण्यास नकार दिला. ही कायदेशीर बाब असून त्या संदर्भातील बाबी उघड करता येणार नाही, अशी जुजबी प्रतिक्रिया त्यांनी दिली.