पालिकेचे पालकत्व Print

प्रतिनिधी
alt

आयुष्याच्या संध्याकाळी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या, एकाकी जीवन कंठणाऱ्या आणि अगतिक ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुंबई महापालिकेने एक धोरण प्रस्तावित केले आहे. या धोरणाला लवकरच अंतिम रूप दिले जाणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० कोटींहून अधिक झाली आहे. त्यापैकी १२ लाख ज्येष्ठ नागरिक मुंबईत असून त्यापैकी २१ टक्के दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत आहेत. सोयी-सुविधांचा अभाव आणि असुरक्षिततेची भावना या त्यांच्यासमोरील मुख्य समस्या आहेत. मुंबई परिघातील ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मान मिळावा, त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर व्हावी, आरोग्यासह अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी ठाणे, पुणे महापालिकांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबई महापालिकेने हे धोरण प्रस्तावित केले आहे. भाजप नगरसेवक विनोद शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे या धोरणाबाबतचे महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक विभागामध्ये ५०० चौरस फूट जागेत विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रभाग समितीच्या निधीतून उभारण्यात येणारी ही केंद्रे स्थानिक संस्थांना चालविण्यासाठी दिली जातील. आधार केंद्रांमध्ये दूरदर्शन संच, वृत्तपत्रे, नियतकालिके उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच योगसाधना, ब्रीज, सुडोकू, बुद्धिबळ यांसह मनोरंजन/विरंगुळा योजना राबविण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध सणांचे, तसेच व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन या केंद्रांमध्ये करण्यात येईल. या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत नाटय़गृहही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्येष्ठांना सभा आणि अन्य कार्यक्रमांसाठी प्रत्येक विभागातील एका शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्येष्ठांसाठी उद्यानांमध्ये विशिष्ठ ठिकाणी बैठकीची, तसेच रॅम्प आणि रेलिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पॅरागोला आणि अ‍ॅम्फिथिएटर, ३४ उद्याने आणि विरंगुळा मैदाने ठराविक वेळेत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उपचारांसाठी रुग्णालयात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. बसल्या जागी विशिष्ट ट्रॉलीवरून संगणक आणि प्रिंटरद्वारे त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. पालिकेची प्रमुख रूग्णालये व त्यांच्याशी संलग्न १६ रूग्णालये, दवाखान्यांमध्ये त्यांना परिपूर्ण आरोग्यसेवा सहजगत्या उपलब्ध करण्यात येणार आहे. तपासणी आणि उपचारासाठी मार्गदर्शनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपीस्ट, डाएटिशियन, आरोग्य समाज सेवक आणि परिचारिका यांचा समावेश असलेल्या बहुउद्देशीय टीममार्फत त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्येष्ठांसाठी आठवडय़ातून एकदा बाह्यरुग्ण कक्ष, तसेच ‘मेमरी क्लिनिक’ सुरू केले जाणार आहे. दारिद्रय़रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आणि शस्त्रक्रिया ५० टक्के दराने केली जाणार आहे. विशेष सहाय्य कक्ष स्थापन करणार, आरोग्य समाज सेवकांमार्फत गरीब व गरजूंना आर्थिक मदत आणि समुपदेशन, तात्काळ आरोग्य सेवेसाठी विशेष हेल्पलाईन आदी सुविधाही धोरणात प्रस्तावित आहेत.