संक्षिप्त Print

श्रीमद्भगवद्गीता संथावर्ग
श्रीमद्भगवद्गीता नि:शुल्क संथावर्गाचे आयोजन श्रीकृष्ण जोशी यांनी केले आहे. १३ ऑक्टोबरपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ४ ते ५.३० या वेळेत हे वर्ग समर्थ व्यायाम मंदिर, दुसरा मजला, प्र. ल. काळे गुरूजी मार्ग, दादर पश्चिम येथे घेण्यात येणार आहेत. या वर्गाविषयीच्या अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण जोशी यांच्याशी २४३००८१७ अथवा ९६१९८२८१५७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनव्यवस्थाविषयक कार्यशाळा
मुंबई विकास समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई शासनव्यवस्था या विषयावर चर्चासत्र, कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. मुंबईच्या विकासासाठी आगामी काळात तब्बल २ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा निधी योग्य रितीने वापरला जावा, प्रशासनाची कार्यक्षमता वाढावी, प्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावेत या उद्देशाने विचार करण्यासाठी ही कार्यशाळा होणार आहे. यात मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, निवृत्त सनदी अधिकारी, राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ज्येष्ठ पत्रकार, स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी होणार असून चर्चेनंतर शिफारसी करण्यात येतील. राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, माजी सनदी अधिकारी शरद काळे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी अनिल गचके (९८२१७३१२८१), अजित शेणॉय (९८६९००८४०९) यांच्याशी संपर्क साधावा.
एकता काव्यलेखन स्पर्धा निकाल
एकता कल्चरल अकादमीच्या गणपत गुणाजी जाधव स्मृती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सुनील उबाळे यांना प्रथम, दत्ता सावंत यांना द्वितीय तर शिवाजी शिखरे यांना तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत १४५ कवी-कवयित्री सहभागी झाले होते. उत्तेजनार्थ पारितोषिके व एकता पदक रमेश सावंत, प्रकाश सैंदाणे, शैलेश उपाध्ये, डॉ. शरयू शहा, शशिकांत तांबे, लता गुठे, दिलीप गडकरी यांना जाहीर झाली आहेत. अशोक बेंडखेळे व विष्णू सोनवणे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकता कल्चरल अकादमीच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या २४ व्या सांस्कृतिक महोत्सवात केला जाणार आहे, असे संस्थेचे सचिव बाळाराम कासारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
दिनदर्शिकेसाठी आवाहन
कोकणातील निसर्गसौंदर्य, सण, उत्सव, शेती यांची माहिती असणारी दिनदर्शिका कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रकाशित केली जाते. त्यासाठी कोकणाचे सौंदर्य दर्शविणारी जलचित्रे, तैलचित्रे, कोकणातील सण, संस्कृती, शेती व कोकण विकासात ग्रामस्थ मंडळांचे योगदान या विषयावर बाराशे ते पंधराशे शब्दांत लिहिलेले लेख, कोकणातील उत्पादनांपासून बनविलेल्या पाककृती लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोकण विकास प्रतिष्ठान, सी-९२, मनोरा आमदार निवास, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१ या पत्त्यावर मजकूर, छायाचित्रे पाठवावीत. अधिक माहितीसाठी २४७९२२६६ अथवा ९८६९०१६०९२ या क्रमांकांवर संपर्क  साधावा.