अपहृत प्रिन्स ५ महिन्यांनतर भाईंदरला सापडला Print

प्रतिनिधी
एप्रिल महिन्यात ग्रॅण्ट रोड येथून अपहरण झालेला प्रिन्स हा चार महिन्यांचा मुलगा अखेर भाईंदर येथे सापडला आहे. डी बी मार्ग पोलिसांनी ५ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर प्रिन्सचा शोध घेऊन त्याला पळविणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले आहे.
प्रिन्स हा सुनीता दांडेकर या ग्रॅण्ट रोडला राहणाऱ्या व मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या महिलेचा मुलगा आहे. सुनीता कामावर गेल्यावर १३ वर्षांची ही मुलगी प्रिन्सचा सांभाळ करायची. २२ एप्रिल रोजी ती प्रिन्सला घेऊन पळून गेली. याबाबत सुनीता दांडेकर यांनी दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी पोलीस  प्रिन्सचा शोध घेत होते. पळवून नेलेला प्रिन्स हा भिकाऱ्यांच्या टोळीत नेला असावा, अशी शक्यता सुरुवातीपासून पोलिसांनी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलीस बालसुधारगृहात असलेल्या या १३ वर्षांच्या मुलीपर्यत पोहोचले. माटुंगा येथे एका मुलाच्या अपहरणप्रकरणी या मुलीला अटक झाल्यापासून ती या बालसुधारगृहात होती.
पोलिसांनी या मुलीची चौकशी केल्यानंतर तिने प्रिन्सच्या अपहरणाची कबुली दिली. डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सुर्वे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने प्रिन्सच्या अपहरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. मालवणीला राहणाऱ्या मुलीने प्रिन्सला पळविल्यानंतर ती आठवडाभर मालवणी परिसरात भीक मागत होती. नंतर भाईंदर येथे एका व्यक्तीला आपण अनाथ असून आपल्या लहान भावाचा सांभाळ करा, अशी विनंती करत प्रिन्सला त्यांच्या ताब्यात देऊन तेथून निघून गेली होती. पोलिसांनी भाईंदरला जाऊन प्रिन्सला त्या व्यक्तीकडून ताब्यात घेतले, अशी माहिती सुर्वे यांनी दिली.