‘डॉक्टर व रुग्णांमध्ये ‘रुग्णानुबंध’ निर्माण व्हायला हवेत!’ Print

मुंबई / प्रतिनिधी
‘डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध हे जोवर ‘रुग्णानुबंधां’त परिवर्तित होत नाहीत तोवर डॉक्टरांवरील रुग्णांच्या वाढत्या अविश्वासाचा मुद्दा सतत चर्चिला जाणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील व्यवहार हा ग्राहक आणि विक्रेता असा असूच शकत नाही. ज्याप्रमाणे दोन मित्रांच्या परस्परांशी होणाऱ्या व्यवहारांत आर्थिक हितसंबंध आड येत नाहीत, तीच गोष्ट डॉक्टर-रुग्ण संबंधांतही अपेक्षित आहे. कारण यात ‘मानवी व्यवहार’ही अंतर्भूत आहे, ही बाब कदापिही नजरेआड करता येणार नाही,’ असा सूर ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ आयोजित ‘स्नेहमंदिर’ प्रकल्पाच्या ३० व्या वार्षिकोत्सवामधील ‘डॉक्टर आणि समाज परस्परसंबंध’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
डॉ. रवी बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात डॉ. आशीष देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर आणि अ. पां. देशपांडे सहभागी झाले होते. ‘गोवा हिंदू’चे नारायण देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अजय वैद्य यांनी परिसंवादाच्या विषयाची व्याप्ती विशद केली.
प्रारंभीच डॉ. रवी बापट यांनी ‘मुळात अशा विषयावर परिसंवाद ठेवण्याची गरजच का भासते, याचा संबंधितांनी विचार करायला हवा,’ असे सांगून गेल्या चार दशकांत वैद्यक व्यवसायात कसकसे बदल होत गेले, याचा थोडक्यात आढावा घेतला. या प्रक्रियेत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद संपत गेला. डॉक्टरी पेशाचे व्यवसायात आणि पुढे धंद्यात रूपांतर झाले. आणि या बदलांत डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास व आदर गमावला. या सगळ्या स्थित्यंतराची चर्चा या परिसंवादात अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
वैद्यक व्यवसाय आज ४० टक्के मानवी आणि ६० टक्के अभियांत्रिकी झाल्याचे सांगून गिरीश कुबेर पुढे म्हणाले की, त्यामुळेच डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संबंधांबाबत मध्यमवर्गीय भाबडय़ा दृष्टीने चर्चा करणे योग्य ठरणार नाही. प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यक व्यवसाय दिवसेंदिवस अधिकाधिक अभियांत्रिकी आणि खर्चिक होत चालला आहे. या वास्तवाचे भान सर्वानीच ठेवायला हवे. वैद्यक व्यवसायातही इतर व्यवसायांप्रमाणेच बाह्य़शक्ती कार्यरत असतात. यासंबंधात त्यांनी दोन वर्षांमागे जगभर आलेल्या बर्ड फ्ल्यूच्या साथीमागे बुश प्रशासनाचे हितसंबंध कसे होते, ते वानगीदाखल कथन केले. फक्त शिक्षक आणि डॉक्टरांनी तेवढे चांगले राहणीमान का मिळवू नये? त्यासाठी आवश्यक असलेले पैसे आपल्या व्यवसाय-कौशल्यांद्वारे त्यांनी का मिळवू नयेत? त्यात गैर ते काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वैद्यक व्यवसायातील बदल हे चांगल्यासाठीच आहेत; फक्त त्याचे नियमन करणारी सक्षम नियामक यंत्रणा हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आज सगळ्याच क्षेत्रांमध्ये भौतिक प्रगती आणि नैतिक अधोगती होताना दिसते. वैद्यक क्षेत्रही त्याला अपवाद नाही, असे सांगून विजय कुवळेकर पुढे म्हणाले की, डॉक्टरकीचा पेशा हा पूर्वी व्रत म्हणून केला जाई. पुढे त्याचे रूपांतर व्यवसाय, धंदा, बाजार, उद्योग असे होत गेले. डॉक्टरांची रुग्णांकडे पाहण्याची दृष्टी बदलली, तशीच रुग्णांचीही त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण झाला. तो का निर्माण झाला, याचा वैद्यक क्षेत्राने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. विनाअनुदानित वैद्यक महाविद्यालयातील प्रवेशापासूनच हा ऱ्हास सुरू झाला. याबाबतीत वैद्यक संघटना काय करतात, असा सवाल त्यांनी केला.
वैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आज रुग्णांना फायदा मिळतो आहे. प्रगत तंत्राबरोबरच महागाईही आलीच. ती सहन करावीच लागणार. जिथे समाजाचीच नैतिकता घसरलीय, तिथे डॉक्टरांकडून त्याची अपेक्षा का धरावी, असा प्रश्न डॉ. अ. पां. देशपांडे यांनी उपस्थित केला. डॉक्टर बिघडण्याची सामाजिक कारणे शोधायला हवीत, असे ते म्हणाले.
समाजाचा ऱ्हास होतोय म्हणून सर्वानीच नीतिमत्ता सोडावी का, असे विचारून डॉ. रवी बापट म्हणाले की, डॉक्टरांवर माणसाचे जगणे-मरणे अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्यावर विशेष जबाबदारी येते. म्हणूनच त्यांनी ‘धंदा’ करावा, असे म्हणणे सर्वथा गैर आहे. त्याकरिता वैद्यक व्यवसायाचे ‘ऑडिट’ व्हायला हवे आणि ते नियमन समाजानेच करायला हवे.
वैद्यक शाखेला जाण्याची विद्यार्थ्यांची वैद्यक प्रवृत्ती आहे काय, हेच मुळी आधी पाहिले जात नाही, आणि इथूनच सगळी गडबड सुरू होते, असे सांगून डॉ. आशीष देशपांडे म्हणाले की, वैद्यकीय ज्ञान देण्याच्या प्रक्रियेतही ही गोष्ट दुर्लक्षित होते व त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. पूर्वी डॉक्टर ही वडीलधारी व्यक्ती मानली जाई. आज डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विक्रेता व ग्राहकाचे नाते निर्माण झाले आहे. उभयपक्षी हा दृष्टिकोन अयोग्य आहे. डॉक्टर जर रुग्णाचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ झाला तर चांगले परिणाम मिळतात. त्यांच्यातील ‘रुग्णानुबंध’ खूप महत्त्वाचे ठरतात. अशा प्रकारचे दृढ नाते जोवर त्यांच्यात निर्माण होत नाही, तोवर डॉक्टर-रुग्ण संबंधांबाबत चर्चा होतच राहणार आहे.