धूम्रपानबंदी कायदा कागदावर.. Print

अंमलबजावणीचा नुसताच धूर!
प्रसाद रावकर, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास व सिगरेटची विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली, पण मुंबईत मात्र सार्वजनिक ठिकाणांना सिगारेट-विडीच्या धुराची वेटोळी आणि तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा पडलेलाच आहे. या बंदीची अमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले अन्न आणि औषध प्रशासन, स्थानिक पोलीस ठाणी आणि महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसल्याने निव्र्यसनींनाही अशा धूम्रपानाचे दुष्परिणाम भोगावे लागतील अशी भीती गडद झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदीची काटेकोर अंमलबजावणी शक्य नसेल, तर निदान धूम्रपान करणाऱ्यांसाठी ‘स्मोकिंग झोन’ची व्यवस्था करा आणि निव्र्यसनींना तरी या संकटाच्या विळख्यातून सोडवा, असे साकडे आता नशाबंदी मंडळाने घातले आहे.
धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थावरील प्रतिबंधासाठी २००३ मध्ये कायदा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी १ मे २००४ पासून सुरू झाली. तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जाहिरात, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, १८ वर्षांखालील व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे, शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे आदींना या कायद्याद्वारे बंदी घालण्यात आली होती. पुढे या कायद्यात २००८ मध्ये आणखी कठोर सुधारणा करण्यात आल्या व कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने अन्न-औषध प्रशासन, स्थानिक पोलीस ठाणी आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यासह १९ यंत्रणांवर सोपविली. मात्र बऱ्याच ठिकाणी चित्र उलटेच दिसते. यापैकी अनेक कार्यालयांच्या िभतींचे कोपरे आणि कचऱ्याच्या डब्यातच तंबाखूच्या पिचकाऱ्या व सिगरेटची थोटके दिसतात.
हा कायदा अंमलात आल्यानंतर रस्तोरस्तीच्या पानतंबाखू ठेल्यांवर एक फलक दर्शनी भागावर दिसू लागला. १८ वर्षांखालील व्यक्तीस तंबाखूजन्मय पदार्थ विकण्यास मनाई आहे, असे या फलकाद्वारे दुकानदारांना बजावण्यात आले होते. पण, तेव्हापासून आजवर हा मनाई हुकूम किती जणांनी मोडला वा किती जणांवर त्याबद्दल कारवाई झाली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. उलट, सर्व नियमांना हरताळ फासून प्रतिबंधात्मक ठिकाणीही तंबाखूजन्य पदार्थाची राजरोस विक्री होताना दिसते. त्याविरुद्ध तीव्र मोहीम हाती घेण्याचा निर्णय नशाबंदी मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने घेतला आहे. महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानाजवळ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. वेगवेगळ्या आंदोलनांच्या निमित्ताने आझाद मैदानावर मोठय़ा संख्येने नागरिक असतात. यापैकी बहुसंख्य नागरिक मैदानात आणि बाहेरील रस्त्यावर धूम्रपान करतात. मैदानाजवळील खाऊ गल्लीत चहाचे घुटके घेत सिगरेटचा धूर सोडणाऱ्यांची संख्याही कमी नाही.    

बस थांब्यांचा आडोसा..
 महापालिका मुख्यालयात धूम्रपानास बंदी आहे. त्यामुळे आझाद मैदानालगतचा रस्ता आणि बस थांब्यांच्या आडोशाला उभे राहून पालिकेचे कर्मचारी धूम्रपान करताना हमखास आढळतात. नशाबंदी मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरच जनजागृती मोहिमेला प्रारंभ केला, तेव्हा धुराचे फवारे तोंडावर सोडून त्यांचीच खिल्ली उडविण्यात आली, अशी खंत मंडळाच्या सरचिटणीस वर्षां विद्या विलास यांनी व्यक्त केली.