‘माझा प्रवास’ हे पुस्तक इतिहासाचा प्रामाणिक व खात्रीलायक स्त्रोत-प्रा. जे. व्ही. नाईक Print

प्रतिनिधी
गोडसे भटजी लिखित ‘माझा प्रवास’ हे पुस्तक इतिहासाचा प्रामाणिक आणि खात्रीलायक स्त्रोत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार आणि एशियाटिक सोसायटीचे विश्वस्त प्रा. जे. व्ही. नाईक यांनी मंगळवारी मुंबईत केले.
प्रा. सुखमणी रॉय यांनी ‘माझा प्रवास’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद  ‘द ट्रॅव्हल्स ऑफ १८५७’ या नावाने केला असून त्याचे प्रकाशन एशियाटिक सोसायटीच्या दरबार सभागृहात प्रा. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मित्रा पारेख, प्रा. मिलिंद मालशे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. हे पुस्तक रोहन प्रकाशनाच्या ‘रोहन प्रिंट्स’ या इंग्रजी शाखेने प्रकाशित केले आहे.
गोडसे भटजींच्या मते हे केवळ प्रवासवर्णन नसून त्या काळातील सुक्ष्म निरिक्षणांची ही नोंद आहे. पूर्वग्रहदूषित कोणत्याही निरीक्षणांना त्यांनी वगळलेले नाही. झाशी येथे मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या कुंटणखान्यांचा उल्लेखही त्यांनी वगळलेला नाही, असे प्रा. नाईक म्हणाले.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. मित्रा म्हणाल्या की, मराठीतून इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक उत्कृष्ट अनुवादाचा नमुना म्हणून ओळखले जाईल. १९ व्या शतकातील मराठी भाषेचा जो अस्सल बाज होता तो इंग्रजी अनुवाद करताना रॉय यांनी जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तर प्रा. मालशे यांनी सांगितले की, हे पुस्तक केवळ प्रवासर्णन नसून ते आत्मचरित्रात्मक लिखाण व इतिहासाचे खात्रीशीर साधन आहे. तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या काळातील समाजजीवनाचे चित्र उलगडून दाखविणारा महत्वाचा स्त्रोत आहे.
या कार्यक्रमात गोडसे भटजी यांचे पणतू दामोदरशास्त्री गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. रॉय यांनी उपस्थितांचे आभार मानले.