रेल्वेसमस्यांसदर्भात खासदारांनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट Print

प्रतिनिधी
रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी असणारी स्वच्छतालये नि:शुल्क करण्यात यावीत, ठाणे-वाशी मार्गावर दोन नवी स्थानके उभारावीत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या एलिव्हेटेड रेल्वेला प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा मागण्या मुंबई-ठाण्याच्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी केल्या आहेत. कल्याणच्या पुढे मोठय़ा वेगात नगरविकास होत असून रेल्वेने तेथे प्रवासाचे विकास प्रकल्प राबवावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड, सुरेश टावरे, राष्ट्रवादीचे संजीव नाईक, संजय पाटील, आनंद परांजपे, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी रेल्वेमंत्री सी. पी. जोशी यांची तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले. रेल्वे स्थानकांमधील महिला स्वच्छतालये नि:शुल्क वापरण्यासाठी द्यावीत, अशीही मागणी शिष्टमंडळाने करताच महाव्यवस्थापकांनी त्यास आपली मान्यता असल्याचे सांगितले.
मध्य रेल्वेने सुरू केलेल्या १५ डब्यांच्या गाडीचा प्रवास कल्याणपर्यंतच असून त्यापुढेही ती चालविण्यात यावी, कल्याणच्या पुढे असणाऱ्या बहुतेक स्थानकांवर १५ डब्यांची गाडी थांबण्याची सोय असल्याने ती त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. कल्याणच्यापुढे वेगाने नगरविकास होत असून तेथून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हे आवश्यक असून रेल्वेने आपल्या नव्या विकासाच्या योजना कल्याणच्या पुढे सुरू कराव्यात. ठाणे-वाशी दरम्यान दिघा गावाजवळ तसेच कोपरखैरणे आणि रबाळे दरम्यान स्थानके उभारावीत, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. रेल्वेचे पादचारी पूल, फलाटांची उंची आणि स्वच्छतागृहांची उभारणी यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महाव्यवस्थापकांनी शिष्टमंडळाला यावेळी दिल्याचे सांगण्यात आले.