बनावट नोटांच्या वितरणासाठी बांगलादेशी मजुरांचा वापर Print

प्रतिनिधी
बांगलादेशातून भारतात मजुरीसाठी येणाऱ्या लोकांकडून बनावट नोटा वितरीत केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युनिट १२ ने अटक केलेल्या बांग्लादेशी नागरिकांच्या तपासातून ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी युनिट १२ ने बंगळूरहून आणखी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून पावणेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यत ८ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
युनिट १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितले की, बांगलादेच्या बोनगा सीमेवरून अवैध मार्गाने बांग्लादेशी नागरिकांना भारतात पाठवले जाते. त्यांना १००० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटविण्यासाठी दिल्या जातात. हे बांगलादेशी बहुतांश मजूर असतात. फुटपाथवरील किरकोळ विक्रेते तसेच छोट्या दुकानदारांकडून एखादी वस्तू घेऊन या नोटा वटविल्या जातात. त्यामुळे कुणाला त्यांचा संशय येत नाही. नोटा वटवून झाल्यावर पुन्हा बांगलादेशात जाऊन बनावट नोटा आणल्या जातात. या नोटा वितरीत केल्यानंतर त्यांना १५ ते २० टक्के कमिशन मिळते. त्यामुळे यामागे आतंरराष्ट्रीय टोळी सक्रीय असल्याची माहिती खेतले यांनी दिली.
युनिट १२ ने काही दिवसांपुर्वी मुंबईतून एका महिलेसह तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून पावणेपाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अब्दुल अली (२२) या बांगलादेशी तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पावणेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.