पोलीस ठाण्यात न जाताही बिनधास्त करा तक्रारी.. Print

प्रतिनिधी
तक्रार करायला पोलीस ठाण्यात जायचे नसले तरीही आता कुणीही बिनधास्त तक्रारी आणि सूचना करू शकतो. मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी आता जागोजागी तक्रार पेटय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. गृहमंत्री आर आर पाटील यांनी गुरुवारी या अनोख्या योजनेचा शुभारंभ केला.
नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात. पोलीस ठाण्यातील वाईट अनुभव आणि नाव उघड होण्याची भीती यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यास सहसा तयार होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे यासाठी तक्रार आणि सूचना पेटी ठेवण्याची संकल्पना मांडण्यात आली. सध्या मुंबईत जागोजागी १ हजार तक्रार पेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. या पेटय़ा दर दोन दिवसांनी अपडेट केल्या जाणार आहेत. त्याची चावी विशेष शाखेकडे असणार आहे. या तक्रार पेटय़ामंध्ये आलेल्या सूचना आणि तक्रारींवर कारवाई करण्याचा निर्णय सहआयुक्त आणि पोलीस आयुक्त घेणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून राज्यात इतर ठिकाणीही हा उपक्रम राबविला जाईल, असे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितले. तर गंभीर स्वरूपाच्या तक्रारींचा एफआयर दाखल करून घ्या, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.
तक्रारी या हस्ताक्षरातच असायाला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून त्या करणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला त्या तक्रारीवर काय कारवाई केली गेली त्याची माहितीही दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. तक्रार पेटय़ांच्या माध्यमातून चांगली माहिती देणाऱ्यास  बक्षिसही देण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांच्या व्यतिरिक्त, शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल्स, मोठी हॉटेल्स, कॅफेटेरिया, मंदिरे, सार्वजनिक वाचनालये तसेच झोपडपट्टीत या तक्रार पेटय़ा बसविण्यात येणार आहेत.