बदलत्या सामाजिक वास्तवाचा वेध अध्यक्षीय भाषणातून घेणार- नायगावकर Print

प्रतिनिधी
सभोवतालचे बदलते सामाजिक वास्तव एक कवी आणि संवेदनशील माणूस म्हणून मला अस्वस्थ करते. ‘कोमसाप’साहित्य संमेलनाच्या माझ्या अध्यक्षीय भाषणात कविता किंवा भाषणाच्या माध्यमातून त्याचा वेध घेण्याचा विचार असल्याचे ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दापोली येथे होणाऱ्या १४ व्या ‘कोमसाप’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नायगावकर यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.
एका बाजूला ऐहिक साधने वाढली असली तरी माणूस सुखी नाही. आतून तो पोखरला गेला आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहात असून त्याच्या किंमती दीड ते दोन कोटींपर्यंत आहेत. अन्न, वस्त्र या प्रमाणे निवारा ही माणसाची जीवनावश्यक गरज आहे. घरांची ही वाढती किंमत भावी पिढीसाठी जीवघेणी ठरणार आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आधुनिक काळातील हे आणि असे अनेक प्रश्न खूप अस्वस्थ करतात, असेही नायगावकर म्हणाले. श्री. पु. भागवत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आदी दिग्गज मंडळींनी या संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी भूषविले. माझ्या नावाचा संमेलनाध्यक्षपदासाठी विचार होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे संयोजकांना होकार देताना माझ्या मनावर थोडे दडपण होते. राज्यात, देशात आणि परदेशातही कविता वाचनाचे आजवर हजारो कार्यक्रम केले. पण आता संमेलनाध्यक्ष म्हणून एक वेगळी जबाबदारी माझ्यावर आली असल्याचेही ते म्हणाले.
कवी म्हणून माझी प्रतिमा ही हास्यकवी, मनोरंजन करणारा आणि टाळ्या घेणारा अशी आहे. मी गंभीरपणे काही सांगितले तर ते रसिकांकडून स्वीकारले जाईल का, असे एक द्वंद्व माझ्या मनात आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषणातून माझी जी प्रतिमा आहे त्यानुसार की गंभीरपणे व्यक्त व्हायचे, असा प्रश्नही आपल्यासमोर असल्याचे नायगावकर यांनी सांगितले.