तक्रार करा! Print

भाडेवाढीची ओरड करणारे प्रवासी ‘ढिम्म’च!

प्रतिनिधी
प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा असल्याचे मानले जाते. समाजात जे काही घडते ते प्रसारमाध्यमांच्या मार्फतच आपल्याला मुख्यत्वे कळत असते. रिक्षा-टॅक्सींच्या अन्याय्य आणि असह्य भाडेवाडीने सर्वसामान्यांना आपल्या अगतिकतेची पुन्हा एकदा जाणीव झाली. ही अगतिकता आणि त्यातून येणारी (नुसतीच) चीड एकमेकांशी बोलताना सहज व्यक्त होते. या संतापाला प्रसारमाध्यमांनी योग्य तो ‘आवाज’ दिला. मात्र सनदशीर मार्गाने आपला संताप व्यक्त करण्याच्या सुविधांचा योग्य तो लाभ इंटरनेटच्या जमान्यात नागरिकांनी आणि ‘नेटिझन्स’नीही उठविलेला दिसत नाही. हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे..
रिक्षा भाडेवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या उपनगरवासीयांना सदोष मीटरमुळे लुबाडले जात असल्याच्या अनेक तक्रारी ‘ऐकावयास’ येत असल्या तरी प्रत्यक्षात हे प्रवासी तक्रारी ‘लिहिण्यासाठी’ फारसे पुढे येत नसल्याचे दिसून येते. रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा असलेल्या अंधेरी व घाटकोपर प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या ९ दिवसांत फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच तक्रारी नोंदल्या गेल्याचे आढळून आले आहे. या तक्रारींची दखल घेतल्याचा दावा आरटीओने केला असला तरी प्रत्यक्षात कितीजणांवर कारवाई केली याची आकडेवारी मात्र उपलब्ध झालेली नाही. रिक्षासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी स्वतंत्र भाडेपत्रिका आहे. परंतु बऱ्याचवेळा या भाडेपत्रिकांचा वापर करून प्रवाशांना फसविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. नव्या भाडेसूत्रानुसार किलोमीटरनुसार भाडे द्यावे, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने स्पष्ट केले असले तरी मेकॅनिकल मीटरमध्ये किलोमीटर मोजण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्यक्षात प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात लुबाडणूक केली जात आहे. मात्र फसवणुकीचे प्रकार ज्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत, तसेच घरीदारी, लोकलमध्ये आणि गप्पा मारताना या प्रकारांची जशी चर्चा होते त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष तक्रार करण्यात उमटत नसल्याचे दिसून आले आहे. प्रवाशांसाठी ऑनलाइन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी तक्रारींचा ओघ कमी असल्याचे आढळून आले आहे. अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त ९ तर वडाळा कार्यालयात २४ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये भाडे नाकारणारे तसेच अधिक भाडे आकारणारे आदींचा समावेश आहे. या सर्वावर काय कारवाई करण्यात आली असता संबधित रिक्षांच्या मालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.