गुलाबी हालचालींवर खाकी नजर. Print

प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातून उसंत मिळते न मिळते तोच पोलिसांवर आता नवरात्रौत्सवाच्या बंदोबस्ताची जबाबदारी आली आहे. नवरात्रौत्सवाचा बंदोबस्त नेहमीच्या इतर बंदोबस्तांपेक्षा वेगळा असतो. या काळात छेडछाड आणि प्रेमी युगुलांच्या ‘गुलाबी’ हालचालींना ऊत येतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ ‘पोलीसगिरी’ चालत नाही.
पण त्याचबरोबर सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्य़ांवरही नजर त्यांना ठेवावी लागते. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘छेडछाडविरोधी’ आणि ‘सोनसाखळी चोरीविरोधी’ पथक स्थापन करण्यात आले आहे. मुंबईत नवरात्रौत्सवात तरुणी आणि महिला पारंपारिक वेशात दागिने घालून सजूनधजून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या अंगावरील दागिने चोरणे, सोनसाखळी चोरणे अशा घटना घडत असतात. त्यासाठी खास सोनसाखळी चोरी प्रतिबंधक पथकाची योजना आहे. या पथकातील बीट मार्शल फक्त सोनसाखळी चोरून पळणाऱ्या दुचाकींवर लक्ष केंद्रित करणार आहेत. नवरात्रौत्सवात मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही घडतात. त्या रोखण्यासाठी ‘छेडछाड विरोधी’ पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली. या पथकात १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस हवालदार आणि २ महिला हवालदार साध्या वेशात असणार आहेत. मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर ते नजर ठेवणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात असे पथक तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे दिघावकर यांनी सांगितले. याशिवाय विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून सरप्राईझ नाकाबंदी आणि वाहन तपासणी केली जाणार आहे.
प्रेमी युगुलांना नवरात्रोत्स म्हणजे मोठी पर्वणी असते. रात्री उशीरापर्यंत घरातून बाहेर राहण्याची परवानगी मिळालेली असते. त्यामुळे लॉज आणि इतर निर्जन जागेवर सुद्धा पोलीस नजर ठेवून असतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पालकांनी या काळात मुलांवर अधिक लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याशिवाय प्रत्येक नवरात्रौत्सव मंडळाला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंडळाला खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याससुद्धा सांगण्यात आले आहे. तसेच न२वरात्रौत्सव मंडपाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिसांनी यापूर्वीच डॉल्बी सिस्टिम आणि डीजेवाल्यांना १४९ अंतर्गत नोटिसा बजावून वेळ आणि आवाजाच्या मर्यादा पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ ८ व्या आणि ९ व्या दिवशीच १२ वाजेपर्यत दांडिया खेळण्यास परवानगी देण्यात आली असून इतर दिवशी रात्री १० पर्यंतचीच परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.