रांगोळी स्पर्धेत वेगळेपणाची झलक Print

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ या कार्यक्रमातील नवरात्रीची दुसरी माळ गुंफली गेली नायगाव येथे. मराठमोळय़ा अशा नायगाव परिसरामध्ये सकाळपासून या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. नऊवारी साडी नेसून मंगळागौरीच्या तयारीसाठी इथल्या मंडळांतील भगिनी तयार होत्या. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती रांगोळीच्या स्पर्धेने. संस्कार भारतीपासून ते ठिपक्यांच्या वापरापर्यंत प्रत्येक स्पर्धक रांगोळीमध्ये वेगळेपण सिद्ध करीत होता. सर्वात बेस्ट रांगोळी कुणाची याकरिता प्रत्येक स्पर्धकाचे प्रयत्न सुरू होते.
रांगोळीच्या स्पर्धेनंतर खऱ्या अर्थाने उपस्थितांच्या उत्कंठेला सुरुवात झाली होती. उखाणा घेणं, गाण्याच्या ठेक्यावर ताल धरणं याकरिता चढाओढ सुरू झाली होती. पासिंग द बॉल, रंग वार दागिना सण यांसारख्या विविध स्पर्धेत भाग घेऊन स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक जणी पुढे सरसावल्या होत्या. मराठमोळय़ा नायगावमधील हे चित्र कुणालाही नवीन नव्हतं. लग्नाला अवघे सात महिने झालेलं एक मराठमोळं जोडपं येऊन मराठी गाण्यावर नाचू लागलं तेव्हा उपस्थितांमध्येही आनंदाला उधाण आलं. आता यापुढे नवीन काय असणार याची ओढ प्रत्येकालाच लागली होती. स्पर्धेत हरणाऱ्या जोडप्यालाही काहीतरी करून दाखवायला लागत असल्यामुळे आता कुणाला काय करावं लागतंय याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. दोरी उडय़ा, रेसिपी सांगणं, त्याचबरोबर स्टेजवर परेड करून दाखवणं या अशा सर्व गोष्टींमुळे कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत चढली होती. या कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो मंगळागौर सादर करण्याचा. हातात सूप घेऊन सुपली उडवण्याचा खेळ, त्याचबरोबर पिंगा, घागर कुंकणं, कोंबडा, लाटय़ा बाई लाटय़ा अशा विविध नृत्याआविष्काराने बघणाऱ्यांचे डोळे दिपले. विशेष म्हणजे इथल्या मंडळाने मंगळागौरीची गाणी लाइव्ह सादर करून मंगळागौर सादर केली. याचबरोबर देवीचा जोगवा आणि देवीच्या इतर नृत्याच्या सादरीकरणामुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले.
झालेल्या विविध स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धेत स्नेहा कोलते, प्रीती हिरवे, चेंडू स्पर्धेत रुपाली बेलवलकर, रंग वार सण स्पर्धेत अनिता तिकुडवे, हार अंगठी पैजण स्पर्धेत संजय भुवड आणि राजेश मोरे दाम्पत्य, तर मंगळागौर स्पर्धेत केशरबाग माऊली महिला मंडळ विजेता ठरले.