वरळीच्या पोलिस कॅम्पमध्ये ‘नव भक्ती, नव रात्री’ नव रंग, उत्साहात साजरा Print

‘लोकसत्ता -९९९’ आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा उपक्रम
प्रतिनिधी
alt

रंग, सण, दागिन्यांची ‘झटापटी’, गाणी, उखाणे, वेशभूषा स्पर्धा आदी रंगारंग कार्यक्रमाने वरळीच्या पोलीस कॅम्पमधील अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळात रविवारी सायंकाळ धमाल उडवून दिली. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९-नव शक्ती, नव रंग आणि नव रात्री’ या उपक्रमाच्या निमित्ताने हा कार्यक्रम येथे रंगला होता. या भागातील लहानथोरांच्या गर्दीत रंगलेल्या या कार्यक्रमात मनोरंजनाबरोबरच रांगोळी, वेशभूषा, मंगळागौर या स्पर्धामधून महिलांना आपल्यातील कलाविष्काराचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली. सुरुवातीला रंग, सण, दागिना यांच्या अनोख्या झटापटीने महिलांची त्रेधातिरपीट उडविली. परंतु, शेवटपर्यंत लक्ष विचलित न होता, झटपट रंग, सण किंवा दागिन्यांचे नाव सांगत रसिका झरेकर यांनी या स्पर्धेत आघाडी घेतली. ‘रूसलेल्या राधेला alt
कृष्ण म्हणतो हास, किरणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास’ या त्यांच्या उखाण्यानेही उपस्थिततांची दाद मिळविली. स्पर्धेत बाद होणाऱ्या महिलांना उखाणे, नृत्य, बसफुगडी सारख्या शिक्षा दिल्या जात होत्या. महिलाही या शिक्षा थोडय़ाशा कचरत का होईना पण आनंदाने पूर्ण करीत होत्या. कला दिग्दर्शक हेमंत राणे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या जेरूरीच्या खंडेराया, जोगवा या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात चैतन्य आणले. तर स्वप्नील जाधव आणि स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालकांची भूमिका वठवित या कार्यक्रमात रंगत आणली. ‘हुलाहुल’ या मजेशीर स्पर्धेत मेघा जाधव यांच्या गटाने ‘टीमवर्क’ दाखवून बाजी मारली. त्या आधी मेघा जाधव आणि शलाका पाटणकर यांनी लुटापुटीचे नळावरचे भांडण सादर करून हशा आणि टाळ्यांची वसुली करत पारितोषिक पटकावले. हार, अंगठी, पैंजण या अफलातून स्पर्धेत श्रीयुत व श्रीमती तावडे आणि श्रीयुत व श्रीमती भोसले अनुक्रमे विजेत आणि alt
उपविजेते ठरले. उखाण्यांच्या स्पर्धेत लक्ष्मी कारंडे यांनी बाजी मारली. रांगोळी स्पर्धेत विकास वाडेकर यांनी स्त्रीभ्रूण हत्येवर काढलेल्या रांगोळीला पहिले तर सुबोध अय्यर यांच्या रांगोळीला दुसरे पारितोषिक मिळाले. मंगळागौर स्पर्धेत एकविरा आणि महाकाली ग्रुपला अनुक्रमे पहिले व दुसरे बक्षीस मिळाले. वेशभूषा स्पर्धेत मिता नवार यांनी महागाईचा भस्मासूर सादर करून पहिल्या बक्षीसावर आपले नाव कोरले तर दुसरे बक्षीस नागेश मुंगळेकर यांनी पटकावले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांचा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्यातर्फे १० गॅ्रमचे चांदीचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला. जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स व लोकसत्तातर्फे अष्टविनायक मंडळाला १० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा धनादेश स्वीकारला.